नागपूर : चाचणीचा चुकीचा अहवाल दिल्यामुळे पंचशील चौक येथील निदान पॅथाॅलॉजी लेबॉरेटरीचे डॉ. कैलाश अग्रवाल यांना अतिरिक्त जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाचा दणका बसला. आयोगाने त्यांना तक्रारकर्त्या महिलेला एकूण १० हजार रुपये भरपाई अदा करण्याचा आदेश दिला.
चारू जैन असे तक्रारकर्त्या महिलेचे नाव असून, त्या सिवनी (मध्य प्रदेश) येथील रहिवासी आहेत. डॉ. अग्रवाल यांना या आदेशाचे पालन करण्यासाठी एक महिन्याची मुदत देण्यात आली आहे. अन्यथा, संबंधित रकमेवर पुढील कालावधीसाठी वार्षिक नऊ टक्के व्याज लागू होईल, असे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. आयोगाच्या पीठासीन सदस्य स्मिता चांदेकर व सदस्य अविनाश प्रभुणे यांनी हा निर्णय दिला. प्रकरणातील माहितीनुसार, जैन यांनी २९ ऑगस्ट २०१६ रोजी डॉ. सतीश जेस्वानी यांच्या सल्ल्यानुसार निदान पॅथॉलॉजीमध्ये चाचणी केली होती. त्याच्या अहवालावरून डॉ. जेस्वानी यांनी जैन यांच्या दोन्ही किडन्या खराब झाल्याचे सांगितले. त्यानंतर जैन यांनी किडनी स्पेशॅलिस्ट डॉ. खेतान यांच्या सल्ल्यानुसार ३० ऑगस्ट २०१६ रोजी दुसऱ्या पॅथॉलॉजी लॅबमध्ये चाचण्या केल्या. त्यात जैन यांच्या दोन्ही किडन्या सुस्थितीत असल्याचे आढळले. जैन यांनी डॉ. अग्रवाल यांच्याशी यासंदर्भात चर्चा केली. पण, त्यांनी निष्काळजीपणा मान्य केला नाही. जैन यांनी ग्राहक आयोगात तक्रार दाखल केली. त्यात डॉ. अग्रवाल यांनी लेखी उत्तर दाखल करून सदर तक्रार केवळ पैसे उकळण्याच्या हेतूने दाखल करण्यात आल्याचा आरोप केला तसेच पॅथॉलॉजी चाचणीत विविध कारणांमुळे भिन्न निष्कर्ष दर्शविले जाऊ शकतात, असा दावा केला. यामुळे तक्रार खारीज करण्याची मागणी केली. शेवटी आयोगाने विविध बाबी लक्षात घेता सदर निर्णय दिला. तक्रारकर्तीच्यावतीने ॲड. निशिगंधा मासुरकर यांनी कामकाज पाहिले.