लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : श्री गणपती बाप्पाला निरोप देण्याची घटिका आली आहे. अनंत चतुर्दशीला शहरात मूर्तींचे विसर्जन होईल. यासाठी मनपा व पोलीस प्रशासनाने आपली तयारी पूर्ण केली आहे. तलावांमध्ये विसर्जनावर बंदी घातली असल्याने शहरात विविध ठिकाणी २४८ कृत्रिम टँक उभारण्यात आल्या आहेत. यात सेंट्रिंगच्या लोखंडी २०८ टँकचा समावेश आहे. यासोबतच शहरातील चार तलावांच्या काठावर स्थायी कृत्रिम टँक उभारण्यात आले आहेत.
शनिवारी मनपा आयुक्त राधाकृष्णन बी., अतिरिक्त आयुक्त राम जोशी व घनकचरा व्यवस्थापन विभागाचे नोडल अधिकारी डॉ. गजेंद्र महल्ले यांनी शहरातील गांधीसागर, फुटाळा, सक्करदरा व सोनेगाव तलावाचे निरीक्षण केले. तलावात कोणत्याही परिस्थितीत मूर्तींचे विसर्जन होऊ नये, अशी ताकीद यावेळी त्यांनी दिली. यासोबतच गर्दी नियंत्रित करण्याचे पर्याय आयुक्तांनी पोलीस निरीक्षकांना सांगितले. तलावांच्या शेजारी मोठ्या संख्येेने कृत्रिम टँक उभारण्यात आले आहेत.
आयुक्तांनी निर्माल्य संकलनासोबतच परिसर स्वच्छ ठेवण्याचे निर्देश दिले. गणेशभक्तांना कोणत्याही स्थितीत त्रास होऊ नये, याची काळजी घेण्याचे आदेशही त्यांनी दिले. निर्माल्य संकलनासाठी स्वयंसेवी संस्थांची मदत घेण्याचे आवाहन यावेळी आयुक्तांनी केले. झोन स्तरावर मोबाईल विसर्जन व्हॅन सज्ज ठेवण्याचे निर्देश प्रशासनाकडून देण्यात आले आहे.
मुलांमध्ये उत्साह
शनिवारी नागपुरात विसर्जनासाठी येणाऱ्यांची गर्दी उसळली होती. कौटुंबिक बाप्पाच्या विसर्जनासाठी अनेक लोक सहपरिवार उपस्थित होते. लहान मुलांमध्ये विसर्जनाच्या वेळी उत्साह दिसून येत होता.
झोनस्तरावर जबाबदाऱ्या निश्चित
विसर्जनासाठी तयारी पूर्ण झाल्याचे घनकचरा व्यवस्थापन विभागाचे नोडल अधिकारी डॉ. गजेंद्र महल्ले यांनी सांगितले. या व्यवस्थेचा शनिवारी अंतिम आढावा घेण्यात आला. प्रत्येक झोनमध्ये आरोग्य विभागाच्या पथकांची जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. कोणत्याही परिस्थितीत भक्तांना त्रास होणार नाही, ही खबरदारी घेतली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
झोन - कृत्रिम टँक
लक्ष्मीनगर - २६
धरमपेठ - ५१
हनुमाननगर - २७
धंतोली - १९
नेहरूनगर - ४०
गांधीबाग - २५
सतरंजीपुरा - १४
लकडगंज - १८
आशिनगर - १०
मंगळवारी - १८
एकूण - २४८
............