नागपूर : राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर हे आज नागपुरात असून त्यांनी विदर्भ चळवळीला गती देण्याच्या दृष्टीने प्रशांत किशोरविदर्भवादी नेत्यांना मदत करत आहेत. आज त्यांनी विदर्भ राज्याची भूमिका समजून घेण्यासाठी विदर्भवादी नेत्यांची भेट घेतली.
स्वतंत्र विदर्भाची मागणी खूप जुनी आहे. मात्र, ही चळवळ अनेकांनी मध्येच सोडल्याची उदाहरणंही आहेत. विदर्भ राज्य आंदोलन समिती सातत्याने या मुद्द्यावर आंदोलने करीत आहे. नव्याने तयार झालेल्या शेजारील लहान राज्यांची प्रगती वेगाने सुरू आहे. परंतु, विदर्भासारखा सुजलाम सुफलाम प्रदेश मात्र आजही मूलभूत सुविधांसाठी झगडत आहे. प्रस्थापित राजकीय पक्षांनीही याचा केवळ निवडणुकीपुरता वापर केला. त्यामुळे वेगळ्या विदर्भाची मागणी करणाऱ्या राजकीय पक्षांवरचा जनतेचा विश्वास उडाला आहे. या पार्श्वभूमीवर काही विदर्भवाद्यांनी प्रशांत किशोर यांच्या संपर्क साधला होता.
काय म्हणाले प्रशांत किशोर
विदर्भाची संकल्पना छोटे राज्य या संकल्पनेशी जोडलेली नाही. छोट्या राज्यांशिवाय इथली भौगोलिक, आर्थिक, सामाजिक परिस्थितीशी जुळलेली आहे. त्यामुळे वेगळ्या विदर्भाकडे केवळ छोट्या राज्यांच्या दृष्टीकोनातून पाहिले जाऊ नये. इथे १० लोकसभेच्या जागा आहेत. त्यामुळे एवढे मतदारसंघ असलेल्या राज्याला लहान म्हणता येणार नाही, असे प्रशांत किशोर म्हणाले.
आज नागपुरात होत असलेल्या या बैठकीमध्ये प्रशांत किशोर विदर्भातील नेत्यांसोबत चर्चा करणार असून विदर्भ राज्यासाठी त्यांच्या काय सूचना आहेत, त्यानंतर भविष्याची रणनीती ठरवली जाईल. विदर्भ वेगळा झाल्यास त्याबाबतच्या फायद्यातोट्याचा विचार झाला पाहिजे. पण यासंदर्भातील अंतिम निर्णय विदर्भवादी नेतेच घेतील, असंही प्रशांत किशोर यांनी सांगितलं.