नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सूचनेनंतर भाजपने मिशन बारामती हाती घेतले आहे. येत्या लोकसभेच्या निवडणुकीत कोणत्याही परिस्थितीत बारामतीवर भाजपचा झेंडा फडकविण्यासाठी नियोजन केले जात आहे. याचाच भाग म्हणून भाजपचे प्रदेश अध्यक्ष आ. चंद्रशेखर बावनकुळे हे मंगळवारी बारामती दौऱ्यावर जात आहेत. बारामती लोकसभा क्षेत्राचा आढावा घेऊन कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या सूचनेनुसार आगामी लोकसभा निवडणुकीसाठी बारामती लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्यावर सोपविण्यात आली आहे. त्यांचा या महिन्यात दौरा नियोजित आहे. या पार्श्वभूमीवर बावनकुळे हे मंगळवारी संपूर्ण एक दिवस ते बारामती लोकसभा क्षेत्रात विविध कार्यक्रम व बैठकांतून संवाद साधून भाजप संघटनात्मक बाबींवर कार्यकर्त्यांशी चर्चा करतील.
जिल्हा भाजपची बैठक, बुथ कार्यकर्त्यांची बैठक, सोशल मीडिया बैठक, लोकसभा कोअर टीमची बैठक अशा विविध बैठका घेऊन ते एकूणच लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहेत. यानंतर विविध गणपती मंडळे व देवस्थानांनाही भेटी देणार आहेत.