योगेश पांडे नागपूर ‘विहिंप’चे (विश्व हिंदू परिषद) नाव घेताच डोळ्यासमोर येते आक्रमक हिंदू संघटना. परंतु सुवर्णजयंती वर्षात ‘विहिंप’ने सामाजिक प्रतिमा निर्माण करण्यासाठी जनमानसांत जास्तीतजास्त पोहोचण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. ‘विहिंप’चा आजच्या तारखेतील महत्त्वाकांक्षी सेवाप्रकल्प म्हणजे ‘इंडिया हेल्थ लाईन’. देशातील गरीब जनतेला खासगी डॉक्टरांसोबत जोडण्यासाठी ‘विहिंप’ने काही महिन्यांपूर्वी ‘इंडिया हेल्थ लाईन’ची सुरुवात केली आहे. या प्रकल्पानुसार ‘विहिंप’ने देशभरातील ४० हजार डॉक्टरांना जोडण्याचे उद्दिष्ट समोर ठेवले आहे. आतापर्यंत सुमारे ५ हजार डॉक्टर याअंतर्गत आले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.देशातील गरीब जनतेला पैशांअभावी खासगी डॉक्टरांकडे जाणे शक्य होत नाही व अनेकदा उपचाराअभावी त्यांचे हाल होतात. हीच बाब लक्षात ठेवून ‘विहिंप’ने खासगी डॉक्टरांना एकत्र जोडण्यासाठी हा प्रकल्प सुरू केला आहे. याअंतर्गत देशातील विविध भागांत या डॉक्टरांकडून जनतेला मोफत सेवा पुरविल्या जातील अशी माहिती सूत्रांनी दिली. शिवाय ग्रामीण भागांत ‘हेल्थ अॅम्बेसेडर’देखील निर्माण करून प्राथमिक स्वरुपाच्या चाचण्या व उपचार नागरिकांना मिळावे यादृष्टीनेदेखील प्रयत्न आहेत. घरवापसीच्या मुद्यावर परत आक्रमक झालेले ‘विहिंप’चे आंतरराष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉ.प्रवीण तोगडिया यांच्या नेतृत्वात अनेक ज्येष्ठ पदाधिकारी या प्रकल्पावर काम करत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.महाराष्ट्रावर राहणार भरआजच्या तारखेत ‘विहिंप’चे देशभरात विविध क्षेत्रांतील ३२ हजार हून अधिक सेवाप्रकल्प सुरू आहे. तरीदेखील ‘इंडिया हेल्थ लाईन’अंतर्गत देशात चांगल्या दर्जाच्या वैद्यकीय सेवेचे जाळे तयार करण्याचा ‘विहिंप’चा मानस आहे. यात ‘हेल्पलाईन’देखीलआजच्या घडीला दिल्ली, भोपाळसारख्या मोठ्या शहरांत सुरू झाली आहे. लवकरच देशातील इतर शहरांतदेखील हा उपक्रम राबविला जाणार आहे. विशेषत: ‘विहिंप’चा महाराष्ट्रावर भर राहणार असल्याची माहिती देण्यात आली.
‘विहिंप’चे ‘मिशन इंडिया हेल्थ’
By admin | Published: February 28, 2015 2:21 AM