लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ध्वनिप्रदूषणामुळे नागरिक, पक्ष्यांवर दुष्परिणाम होतो. मानसिक तणाव वाढून चिडचिडेपणा येतो. त्यामुळे ध्वनिप्रदूषणाला आळा घालण्यासाठी रेल्वे सुरक्षा दलाने पुढाकार घेऊन ‘नो हॉर्न’ मिशनला सुरुवात केली असून शुक्रवारी शहराच्या प्रमुख चौकात जनजागृती केली.रेल्वे सुरक्षा दलाचे वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त ज्योती कुमार सतीजा यांनी रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांना सोबत घेऊन ‘नो हॉर्न’ मोहिमेचा शुभारंभ केला. यात नो हॉर्न लिहिलेले बोर्ड हातात घेऊन आरपीएफच्या चमूने संविधान चौकात वाहनचालकांमध्ये जनजागृती केली. हॉर्न वाजवून वातावण दूषित न करण्याचे आवाहन यावेळी वाहनचालकांना करण्यात आले. ध्वनिप्रदूषणाच्या दुष्परिणामांची माहितीही यावेळी नागरिकांना देण्यात आली. ध्वनिप्रदूषण रोखणे हे केवळ वाहतूक पोलिसांचे काम नसून प्रत्येक नागरिकाने आत्मचिंतन करून आपल्या वागणुकीत बदल घडविण्याचे आवाहन ज्योती कुमार सतीजा यांनी केले. नागपूर शहराची ओळख स्मार्ट सिटीच्या रुपाने होत असून नागरिकांनी हॉर्न न वाजविता स्मार्ट होण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात आले. संविधान चौकानंतर डीआरएम कार्यालयाच्या समोरील चौक आणि रेल्वेस्थानकावर वाहनचालकांमध्ये ‘नो हॉर्न’ बाबत जनजागृती करण्यात आली. शाळा, महाविद्यालयातही याबाबत जनजागृती करण्यात येणार असल्याची माहिती सतीजा यांनी दिली. यावेळी रेल्वे सुरक्षा दलाचे निरीक्षक वीरेंद्र वानखेडे, शहर वाहतूक विभागाचे निरीक्षक राघवेंद्रसिंग क्षीरसागर, आरपीएफचे उपनिरीक्षक गौरीशंकर एडले, विकास शर्मा आणि जवान मोठ्या संख्येने उपस्थित होते.