नागपूर : मागील अनेक वर्षांपासून स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी विदर्भवादी नेते आंदोलन करीत आहेत. या आंदोलनातील एक प्रमुख संघटना असलेली विदर्भ राज्य आंदोलन समितीने आता विदर्भाचा लढा आणखी तीव्र करीत २०२३ पर्यंत स्वतंत्र विदर्भ राज्य मिळवायचेच यासाठी ‘विदर्भ मिशन २०२३’ हा अॅक्शन प्लॅन तयार केला आहे. या प्लॅनअंतर्गत आंदोलनाची रूपरेखा ठरवण्यात आली आहे.या मिशन अंतर्गत केंद्र सरकारला २०२३ पर्यंत स्वतंत्र विदर्भ राज्य द्यावेच लागेल, अशी परिस्थिती निर्माण करावयाचा संकल्प विदर्भ राज्य आंदोलन समितीने केला आहे. याची सुरुवात मागच्या रविवारपासून करण्यात आली आहे. गेल्या २४ नोव्हेंबर रोजी विदर्भातील सर्व जिल्हा व तालुकास्तरावर एक दिवसीय ‘आत्मक्लेश’ आंदोलन करण्यात आले. यापुढे विजेचे दर निम्मे करण्यासाठी विदर्भातील वीज महावितरण मुख्य अभियंता कार्यालयासमोर आंदोलन केले जाईल. याची सुरुवात १५ जानेवारी रोजी अकोला येथून होईल. १६ जानेवारीला अमरावती, २० जानेवारीला नागपूर, २२ जानेवारीला चंद्रपूर, २४ जानेवारीला गोंदिया येथे धरणे आंदोलन करण्यात येईल. १० फेब्रुवारी रोजी सर्व जिल्हा व तालुका स्तरावर रास्ता रोको व जेल भरो आंदोलन करण्यात येईल. २५ फेब्रुवारी रोजी नागपुरात रेल रोको आंदोलन करण्यात येईल. १ मे रोजी संपूर्ण विदर्भ बंद आंदोलन होईल.
स्वतंत्र विदर्भ राज्यासाठी आता ‘मिशन २०२३’; आंदोलन समितीचा अॅक्शन प्लॅन तयार
By ऑनलाइन लोकमत | Published: December 02, 2019 12:51 AM