नागपूर :जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाने वैयक्तिक लाभाच्या योजनेंतर्गत झेरॉक्स मशीन वाटपात अन्याय केला. यासंदर्भात समितीच्या बैठकीत सदस्यांनी जाब विचारला. यावर समाज कल्याण सभापती नेमावली माटे व समाज कल्याण विभागाचे अधिकारी निरुत्तर झाल्या. त्यांना यावर स्पष्टीकरण देता आले नाही.
लाभार्थींची यादी बदलण्यात आमचा कोणताही हस्तक्षेत नसल्याचे सभापती व अधिकाऱ्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला. यावर सदस्य आक्रमक झाले. तुमचा हस्तक्षेप नाही तर मग यादीत बदल कसा झाला, असा सवाल करण्यात आला. यावर सभापती व अधिकाऱ्यांना उत्तर देऊ शकले नाही. सदस्यांचा रोष बघता निधी मंजूर करण्यापूर्वी यादी समितीसमोर आणण्याची ग्वाही सभापतींनी दिली.
झेरॉक्स मशीन वाटपात काही सदस्यांवर अन्याय झाल्याचा आरोप आहे. सदस्यांनी सुचविलेली नावेच नव्हती. गत दोन दिवसांपूर्वी जिल्हा परिषद सदस्या राधा अग्रवाल यांनी संताप व्यक्त करून समिती सभापतींसह विरोधी सदस्यांवरही आरोप केले होते. त्याचे पडसाद बुधवारी विषय समितीच्या बैठकीत उमटले. त्यात निधी मंजूर करण्यापूर्वी समितीसमोर यादी आणावी, त्यानंतरच निधी मंजूर करण्याचा पावित्रा सदस्यांनी घेतला. अखेर सभापतींनी समितीसमोर यादी आणल्यानंतरच निधी मंजूर करू, अशी ग्वाही दिली. पदाधिकारी समितीला डावलून निर्णय घेत असल्याचा आरोप सदस्य सुभाष गुजरकर यांनी केला.
अखेर सदस्यांना झेरॉक्स मशीन मिळाल्या
विशेष म्हणजे समिती सदस्या शांता कुमारे यांनी सुचविलेल्या नावाचा यादीत समावेश नव्हता. त्यामुळे सदस्यांनी जाब विचारताच ज्या सदस्यांच्या दोन-दोन झेरॉक्स मशीन मंजूर करण्यात आल्या, त्यातील एक कमी करून यादीत समावेश नाही, त्यांना देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार शांता कुमरे, राधा अग्रवाल व मुक्ता कोकडे यांचा समावेश करण्यात आला.