रेल्वेस्थानकात कारवाई : चंद्रपूर जिल्ह्यातील महिलांची शक्कल, आरपीएफने पकडले लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील दोन महिलांना शुक्रवारी रेल्वे सुरक्षा दलाने दारूची तस्करी करताना रंगेहात अटक करून त्यांच्याकडून ९५२५ रुपयांच्या २२५ बॉटल्स जप्त केल्या. विशेष म्हणजे यातील दोन्ही महिलांनी दारूची तस्करी करण्यासाठी शंका येऊ नये म्हणून हिंदू असताना बुरखा धारण केला होता. रेल्वे सुरक्षा दलाच्या महिला कॉन्स्टेबल सुषमा ढोमणे, उषा तिग्गा यांना रेल्वेगाडी क्रमांक १२६२२ तामिळनाडू एक्स्प्रेसने दारूची तस्करी होत असल्याची गुप्त माहिती मिळाली. त्यांच्या माहितीवरून आरपीएफचे निरीक्षक वीरेंद्र वानखेडे, उपनिरीक्षक कृष्णा नंद राय, होतीलाल मीना, रजनलाल गुर्जर यांची चमू गठित करण्यात आली. या चमूने राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कर्मचाऱ्यांसोबत प्लॅटफार्म क्रमांक २ वर तपास सुरू केला. यावेळी तामिळनाडू एक्स्प्रेस प्लॅटफार्मवर उभी असताना इटारसी एण्डकडील भागात कोच क्रमांक एस १२ समोर दोन महिला संशयास्पद स्थितीत उभ्या असलेल्या आढळल्या. त्यातील एका महिलेने बुरखा घातलेला होता. त्यांची चौकशी केली असता त्यांनी आपले नाव कंचन विजय सूर्यवंशी (३५) रा. जाकिर हुसैन वॉर्ड, बल्लारशा आणि पूनम बच्छराज सूर्यवंशी (३७) रा. भगतसिंग वॉर्ड बल्लारशा असे सांगितले. त्यांच्या जवळील बॅगची तपासणी केली असता त्यात दारूच्या ९५२५ रुपये किमतीच्या २२५ बॉटल्स आढळल्या. लगेच या दोन महिलांना अटक करून आरपीएफ ठाण्यात आणण्यात आले. येथे कागदोपत्री कारवाई केल्यानंतर या महिलांना मुद्देमालासह राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या स्वाधीन करण्यात आले. सहसा बुरखा घातलेल्या महिलांना धार्मिक भावनेमुळे कुणी अधिक विचारपूस करीत नाही. नेमका याच बाबीचा फायदा घेऊन यातील आरोपी महिलांनी हिंदू असूनही बुरखा घातला होता. परंतु दारूची तस्करी होणार असल्याची पक्की माहिती असल्यामुळे त्यांची ही शक्कल कामाला आली नाही अन् त्या आरपीएफच्या जाळ्यात अडकल्या. तस्करीसाठी विविध शक्कल चंद्रपूर जिल्ह्यात दारुबंदीनंतर तस्करांनी आजपर्यंत अनेक शक्कल लढवल्या. यात मिठाईच्या पाकिटातून दारू नेणे, कपडे ठेवण्याच्या खर्ड्यात दारूची तस्करी होत होती. याही क्लृप्त्या पुढे आल्यामुळे नंतर दारूसाठी महिलांचा वापर होऊ लागला. महिला दारू नेत असल्याचे उघड झाल्यामुळे तरुणींचा वापर तस्करीसाठी केल्या गेला. ही बाबही उघड झाल्यामुळे आता चक्क बुरख्याचा गैरवापर झाल्याचे पुढे आले आहे.
दारू तस्करीसाठी बुरख्याचा गैरवापर
By admin | Published: July 08, 2017 2:16 AM