लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : टाळेबंदीच्या काळात समाजकल्याण विभागाकडून निवडक संस्थांना लाभ मिळवून देण्याच्या हेतूने कोरोना निधीचा दुरुपयोग केल्याचा आरोप ज्येष्ठ नगरसेविका आभा पांडे यांनी आज पत्रपरिषदेत केला.
समाजकल्याण विभागाकडून २४ शेल्टर होमपैकी १३ होममध्ये स्वयंसेवी संस्थांकडून नि:शुल्क व्यवस्था करविण्यात आली होती. उर्वरित ९ शेल्टर होममध्ये ३ संस्थांकडून स:शुल्क चहा, नाश्ता, भोजनाची व्यवस्था करविण्यात आली होती. यावर ७६.४९ लाख रुपये खर्च करण्यात आले. जेव्हा की अनेक संस्था नि:शुल्क सेवा देण्यास सज्ज होत्या. काही लोकांचे खिशे भरण्यासाठी हे काम करण्यात आल्याचा आरोप पांडे यांनी लावला. स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने मनपाने २२ लाख लोकांना नि:शुल्क भोजन वितरणाची व्यवस्था केली होती. परंतु, शेल्टर होममध्ये राहणाऱ्या ३२०० लोकांसाठी कोरोना निधीतील लाखो रुपये खर्च करण्यात आले.
राधास्वामी सत्संग मंडळाच्या वतीने ब्रेकफास्ट, लंच, डिनर आदी क्वरंटाईन सेंटरमध्ये मध्ये पोहोचविण्यासाठी मे. हॉटेल हेरिटेजला काम देण्यात आले. यासाठी ३६.७६ लाख रुपये देण्यात आले. त्याच प्रकारे शेल्टर होमच्या व्यवस्थेसाठी वैष्णवी बहुद्देशीय संस्थेला ४१.९८ लाख रुपये, मे. स्टेलर ग्रुपला १२.३२ लाख रुपये, सुसंस्कार बहुद्देशीय संस्थेला २२.१९ लाख रुपये देण्यात आले. अशा तऱ्हेने कोरोना निधीचा दुरुपयोग झाला असून, प्रशासनाने केवळ संबंधित संस्थांना लाभ मिळवून देण्यासाठी निवडक संस्थांची निवड केली आणि लाखो रुपये उडविल्याचा आरोप पांडे यांनी केला आहे.
..............