नागपूर : राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात कोर्टात खटला दाखल करणारे तसेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या विरोधातील प्रकरणामध्ये काँग्रेसचे नेते नाना पटोले यांचे वकील असलेल्या अॅड. सतीश उके यांच्यावर ईडीने कारवाई केली. सहा तास चौकशी केल्यानंतर ॲड. उकेंसह त्यांच्या भावाला अटक केली. यावर पटोलेंनी प्रतिक्रिया देताना जो वकील आमची केस लढतोय त्याच्यावर अशी कारवाई करण्यात आली. सतीश उके हे नाना पटोलेंचे वकील, अशी हवा तयार केली जात आहे. हे मला बदनाम करण्याच षडयंत्र असल्याचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी केला आहे.
नागपूर विमानतळावर आल्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते. माझे वकील म्हणून टार्गेट केलं जातंय. हे योग्य नव्हे. स्थानिक पोलिसांना माहिती न देता मुंबईवरून ईडी येते. कारवाई करते, याचा अर्थ एक मोठं षडयंत्र आहे. काँग्रेस पक्ष हा नेहमी विकासाचा विचार करत आला असून राज्यातील काँग्रेसच्या वाढत्या प्रभावामुळे भाजप बेचैन आहे. त्यामुळेच वकिलाच्या माध्यमातून मला आणि काँग्रेसला बदनाम करण्याचा कटकारस्थान रचले जात आहे. हे कारस्थान कधीच यशस्वी होणार नाही, असेही ते म्हणाले. केंद्रीय सत्तेच्या पायी ईडीला चिल्लर बनवण्याचं काम भाजपने केलय, अशी टीका पटोलेंनी यावेळी केली.
भाजपने ईडीला चिल्लर बनवलं
भाजपची व्यवस्था ही अत्याचारी आहे. त्यांच्याविरोधात कोणी काही बोललं की, ईडी मागे लावली जाते. लोकांना घाबरविण्याचं ईडी हे तंत्र आहे. सतीश उके हे माझे वकील होते. याचा अर्थ त्यांनी काही केलं असेल, तर त्याच्याशी माझा संबंध लावणे योग्य नाही. सुप्रीम कोर्टात न्यायाधीशांनी या प्रकरणी सुमोटो कारवाई करावी, अशी मागणीही नाना पटोले यांनी केली. तसेच ईडीचा वापर करून विरोधी पक्षातील लोकांना घाबरवलं जात असल्याचंही ते म्हणाले.