नागपूर : कोणत्याही संसाधनाचा चांगला वापर केला जाऊ शकतो तसेच दुरुपयोग देखील केला जाऊ शकतो. हीच वस्तुस्थिती तंत्रज्ञानाच्या बाबतीतही लागू होते. जर आपण त्याचा योग्य वापर केला तर ते देश आणि समाजासाठी फायदेशीर ठरेल आणि त्याचा गैरवापर केल्यास ते मानवतेसाठी हानिकारक असेल. आज आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर आपले जीवन सुकर करत आहे. पण डीपफेकसाठी त्याचा वापर समाजासाठी धोकादायक आहे. या संदर्भात नैतिकतेवर आधारित शिक्षण आपल्याला मार्ग दाखवू शकते, असे प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी येथे केले.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा १११वा दीक्षांत समारंभ शनिवारी कविवर्य सुरेश भट सभागृहात पार पडला. त्यावेळी राष्ट्रपती प्रमुख अतिथी म्हणून बोलत होत्या. राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती रमेश बैस अध्यक्षस्थानी होते. तर केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उच्च शिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील प्रामुख्याने उपस्थित होते.
राष्ट्रपती मुर्मू म्हणाल्या, औपचारिक पदवी मिळवणे हा शिक्षणाचा शेवट नाही. आपण जिज्ञासू राहिले पाहिजे आणि आयुष्यभर शिकत राहिले पाहिजे. आज तंत्रज्ञानाचे क्षेत्र झपाट्याने बदलत असताना, सतत शिकत राहणे अधिक महत्त्वाचे झाले आहे. तुम्ही सर्व तरुण आहात. तंत्रज्ञान कसे वापरायचे आणि त्याचा कसा उपयोग करायचा हे तुम्हा सर्वांना माहित आहे. त्यामुळे त्याचा चांगलाच वापर करा.राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० चे उद्दिष्ट भारतीय मूल्यांवर आधारित शिक्षण प्रणाली विकसित करणे आहे जी सर्वांना उच्च दर्जाचे शिक्षण देऊन भारताला जागतिक ज्ञान-शक्ती म्हणून स्थापित करेल. नागपूर विद्यापीठाने हे धोरण लागू केल्याबद्दल त्यांनी विद्यापीठाचे कौतुकही केले. विद्यापीठाच्या पदवी प्राप्त तसेच शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये विद्यार्थिनींची संख्या लक्षणीय असल्याबद्दल विशेष समाधान व्यक्त करुन मुलींच्या शिक्षणातील गुंतवणूक ही देशासाठी मोलाची असल्याचे त्या म्हणाल्या.
नितीन गडकरी म्हणाले, विदर्भ हा महाराष्ट्राचा विकसनशील भाग असून विद्यापीठाच्या माध्यमातून स्थानिक गरजांनुसार संशोधन होण्याची गरज आहे. विद्यापीठाने गुणवत्ता राखत शिक्षणाचे सार्वत्रिकरण करावे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, विद्यापीठ नवसंशोधनाचे केंद्र म्हणून विकसित होत असून स्टार्टअप इको सिस्टीममध्ये महाराष्ट्राने देशात पहिला क्रमांक पटकाविला आहे. नागपूर विद्यापीठातही नव संशोधन आणि स्टार्टअप इन्क्युबेशन सेंटरच्या माध्यमातून उत्तम कार्य सुरु आहे. शकत महोत्सवी वर्षानिमित्त विद्यापीठात नवसंशोधन तसेच सर्वांगिन विकासासाठी १०० कोटींचा निधी उपलब्ध करुन दिला आहे. नवीन आव्हानांचा सामना करण्यासाठी विद्यापीठ सज्ज असल्याचा विश्वासही फडणवीस यांनी व्यक्त केला. कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांनी स्वागतपर प्रास्ताविक केले.
जागतिक भाषा आत्मसात करा - राज्यपाल बैस
राज्यपाल रमेश बैस म्हणाले, पुर्वी ब्रिटीशकालिन मानसिकतेच्या प्रभावातून नोकरीसाठी शिक्षण होते. आता शिक्षण क्षेत्रात अमुलाग्र बदल घडत आहेत. विद्यार्थ्यांनी नोकरीसाठी न शिकता जागतिक स्तरावरील विकसित कौशल्य आत्मसात करावे, सोबत एखादी जागतिक भाषा आत्मसात करावी. कुशल मानव संसाधन निर्माण करण्यासोबतच योग शिक्षणाचे महत्व लक्षात घेऊन या क्षेत्रातील जागतिक संधीचा लाभ घ्यावा.
डॉ. रामचंद्र तुपकरी व राजर्षी रामटेके यांना राष्ट्रपतींच्या हस्ते पदवी प्रदान
विज्ञान व तंत्रज्ञान विद्या शाखेतून डि.एससी. पदवी प्राप्त करणारे डॉ. रामचंद्र हरीसा तुपकरी आणि डॉ. टि. व्ही. गेडाम सुवर्णपदक आचार्य पदवी प्राप्त विद्यार्थिनी राजश्री ज्योतीदास रामटेके यांना राष्ट्रपतींच्या हस्ते पदक देवून गौरविण्यात आले.विद्या शाखानिहाय १२९ संशोधकांना या कार्यक्रमात आचार्य पदवी देऊन सन्मानित करण्यात आले.