लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : संसदेत कृषी विधेयक संमत होत असताना हे सर्व घाईगडबडीत होत असल्याची भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मांडली होती. शेतकऱ्यांशी चर्चादेखील झाली नव्हती. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी एपीएमसी कायद्यात तसेच कृषी क्षेत्रातच सुधारणेबाबत भाष्य केले होते. त्यांच्या पत्राचा दुरुपयोग करून राजकारण करण्यात येत आहे. दिल्लीत आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना आमचे पूर्ण समर्थन आहे, असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते खा. प्रफुल्ल पटेल यांनी केले. नागपुरात सोमवारी ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
संपुआच्या कार्यकाळात कृषिमंत्री असताना शरद पवार यांनी कृषी सुधारणेसाठी अनेक प्रयत्न केले. त्यांनी अनेक राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना पत्रदेखील लिहिले होते. त्यांनी एपीएमसी कायद्यात सुधारणा तसेच कृषी क्षेत्रात संशोधनाचे मुद्दे मांडले होते, हे खरे आहे. मात्र केंद्र शासनाने कृषी सुधारणा कायद्याचे विधेयक अतिशय घाईत आणल्याचेदेखील त्यांनी म्हटले होते. या विधेयकात एपीएमसीचे भविष्य काय असेल, हे स्पष्ट करण्यात आलेले नाही. सोबतच जर खासगी कंपन्यांकडून शेतकऱ्यांची छळवणूक झाली तर त्यांनी कुठे तक्रार दाखल करावी, हे कायद्यात स्पष्ट नाही. त्यामुळेच आम्ही या कायद्याचा विरोध करतो आहे, असे प्रफुल्ल पटेल यांनी सांगितले.
राज्यात पाच वर्ष सरकार चालणार
भाजपचे नेते मागील अनेक दिवसांपासून महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार पडणार, असे दावे करीत आहेत. त्यांना स्वप्न पाहण्याचा पूर्ण अधिकार आहे. मात्र महाविकास आघाडी सरकार पाच वर्ष निश्चित चालेल, असे मत पटेल यांनी व्यक्त केले.