लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : प्रसिद्ध सिनेअभिनेता मिथून चक्रवर्ती यांनी गुरुवारी सकाळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयाला भेट दिली. यावेळी त्यांनी सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांचीदेखील भेट घेतली. पश्चिम बंगालमध्ये गेल्या काही काळापासून संघाने जास्त लक्ष केंद्रित केले आहे. या पार्श्वभूमीवर मागील काही वर्षांपासून राजकारणापासून दूर असलेल्या चक्रवर्ती यांच्या या भेटीने विविध चर्चांना उधाण आले आहे.मिथून चक्रवर्ती सकाळी १०.३० च्या सुमारास नागपूरला आले. त्यानंतर त्यांनी थेट संघ मुख्यालय गाठले. यावेळी त्यांनी सरसंघचालकांशी भेट घेतली. त्यानंतर रेशीमबाग येथील डॉ.हेडगेवार स्मृतिमंदिर परिसराला त्यांनी भेट दिली. येथे त्यांनी आद्य सरसंघचालक डॉ.केशव बळीराम हेडगेवार तसेच द्वितीय सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेतले. संघाचे प्रांत प्रचारक प्रसाद महानकर यांनी त्यांना डॉ.हेडगेवार व गोळवलकर गुरुजी यांची प्रतिमा भेट म्हणून दिली. यावेळी चक्रवर्ती यांना संघकार्य तसेच सेवाप्रकल्पांची माहिती देण्यात आली. मिथून चक्रवर्ती हे तृणमूल कॉंग्रेसतर्फे राज्यसभेवर गेले होते. मात्र त्यांनी २० महिन्यातच राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. तेव्हापासून ते राजकारणापासून दूरच आहेत.
मिथून चक्रवर्ती यांनी घेतली सरसंघचालकांची भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 03, 2019 10:31 PM