दोघांना अटक : गिट्टीखदान परिसरातील घटना लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : क्षुल्लक कारणावरून दोघांनी आपल्या मित्राचा दगडाने ठेचून खून केल्याची घटना घडली. तीन दिवसात शहरात खुनाची ही तिसरी घटना आहे. गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत साईनगरच्या पलांदूरकर ले-आऊटमध्ये ही घटना घडली. मृत सोनबानगर, वाडी येथील रहिवासी निखिल सुधाकर भांगे (२९) हा आहे. तर योगेश ऊर्फ बाबू हरिहर बिसेन (२८) रा. मेघराजनगर, टेकडी वाडी आणि पंकज रामजी कुथे (२८) रा. स्मृतिनगर दत्तवाडी अशी आरोपींची नावे आहेत. निखिल पूर्वी खासगी केबलमध्ये काम करीत होता. सहा महिन्यांपासून तो बेरोजगार होता. आरोपींशी त्याची मैत्री होती. मंगळवारी रात्री ९.३० वाजता पलांदूरकर ले-आऊटमधील पाण्याच्या टाकीजवळ ते दारू पित होते. दरम्यान त्यांच्यात वाद झाला. त्यामुळे दोघांनी मिळून निखिलचा दगडाने ठेचून खून केला. रात्रीची वेळ असल्यामुळे कुणालाच त्याबाबत कळले नाही. खून केल्यानंतर योगेश आणि पंकज तेथून फरार झाले. मृतदेह पाहून नागरिकांनी पोलिसांना सूचना दिली. गिट्टीखदान पोलीस घटनास्थळी पोहोचले. परिसरातील नागरिक मृतदेह ओळखू शकले नाहीत. हातावर गोंदलेल्या नावावरून पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. दरम्यान निखिलचे कुटुंबीय भेटले. पोलिसांना खुनाच्या काही वेळेपूर्वी निखिलला आरोपींसोबत पाहिल्याची माहिती मिळाली. कुटुंबीयांनी त्यांच्या शेगावला जाण्याची माहिती दिल्यामुळे पोलिसांचा संशय बळावला. दरम्यान पोलिसांना आरोपी मधूनच नागपूरला परतल्याची माहिती मिळाली. त्यांनी कोंढाळीजवळ आरोपींना पकडण्यासाठी सापळा रचला. पोलिसांना पाहून बाईकवर स्वार आरोपींनी पळ काढला. पोलिसांनी पाठलाग करून त्यांना अटक केली. चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. महिनाभरापूर्वी आरोपींचा मोबाईलवरून निखिलशी वाद झाला होता. त्या वादातून मंगळवारी त्यांच्यात भांडण झाले. आरोपींच्या मते निखिलने त्यांना शिविगाळ केली. त्यामुळे त्यांनी त्याचा खून केला. आधीच रचला खुनाचा डाव आरोपींनी निखिलचा खून करण्याचा डाव आधीच रचल्याची पोलिसांना शंका आहे. त्यामुळे ते निखिलला घेऊन घटनास्थळी गेले. तेथे खूप दारू पिल्यानंतर त्यांनी वाद घातला. त्यानंतर दगडाने ठेचून त्याचा खून केला. पोलिसांच्या जाळ्यात इतक्या लवकर अडकू असे त्यांना वाटले नव्हते.
क्षुल्लक कारणावरून मित्राचा खून
By admin | Published: June 22, 2017 2:04 AM