नागपूर : तहसील पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गार्ड लाईन भागात प्रेमप्रकरणातून मित्राचा खून केल्याच्या आरोपातून अतिरिक्त सत्र न्यायाधीश के. जी. राठी यांच्या न्यायालयाने आरोपीची निर्दोष सुटका केली. मोहम्मद जुम्मन मोहम्मद निजामुद्दिन (२१), असे आरोपीचे नाव असून तो डोबीनगर येथील रहिवासी आहे. ताज मोहम्मद ऊर्फ मेदूल नूर हसन अन्सारी (१८), असे मृताचे नाव होते. सरकार पक्षानुसार या प्रकरणाची हकीकत अशी की, ताज मोहम्मद आणि मोहम्मद जुम्मन हे मित्र होते आणि एकाच मोहल्ल्यात राहायचे. जुम्मन हा मोहल्ल्यातील एका मुलीवर एकतर्फी प्रेम करीत होता. अलीकडे या मुलीने जुम्मनसोबत बोलण्याचे टाळून ती ताज मोहम्मद याला वारंवार भेटायची, मोबाईलवरून बोलायची. या दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाल्याचा संशय जुम्मनला होता. त्यामुळे त्याने ताज मोहम्मदला आपल्या मार्गातून हटवण्याचा निर्णय घेतला होता. जुम्मन याने ताजला १३ मार्च २०१३ रोजी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास गार्ड लाईन भागातील रेल्वेलाईननजीकच्या निंबाच्या झाडाजवळ बोलावले होते. या ठिकाणी जुम्मनने ताजच्या डोक्यात मोठा दगड घालून त्याचा निर्घृण खून केला होता. मृताचे वडील नूर हसन अली हुसेन अन्सारी यांच्या तक्रारीवरून तहसील पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून आरोपी जुम्मनला अटक केली होती. (प्रतिनिधी)
प्रेमप्रकरणातून मित्राचा खून, आरोपी निर्दोष
By admin | Published: April 05, 2015 2:30 AM