नागपूर : उत्तर प्रदेशातील लखीमपूर खीरी येथील न्याय मागणाऱ्या शेतकऱ्यांना चिरडून टाकल्याच्या घटनेचा निषेधार्थ राज्यातील महाविकास आघाडीने सोमवारी ‘महाराष्ट्र बंद’चे (Maharashtra Bandh) आवाहन केले होते. नागपुरात या बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे.
उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी (Lakhimpur Kheri Case) येथे घडलेल्या हिंसाचाराच्या निषेधार्थ महाविकास आघाडी(Mahavikas Aghadi) सरकारने आज 'महाराष्ट्र्र बंदची' हाक दिली आहे. नागपुरात या बंदच्या समर्थनार्थ राजकीय पक्षांनी विविध ठिकाणी आंदोलनं केली, मोर्चे काढून निदर्शने केली. तर, दुसरीकडे व्यापारी वर्गाने या बंदला आधीच विरोध दर्शविला होता. त्यामुळे शहरातील दुकाने, भाजी मार्केट, बाजारपेठ सुरू आहेत.
काँग्रेसच्या वतीने काढण्यात आलेल्या रॅलीदरम्यान काही ठिकाणी कार्यकर्त्यांनी सुरू असलेली दुकाने बंद करायला लावली होती. मात्र, काही वेळाने बाजारपेठा सुरू झाल्या. नागपुरातील कॅाटनमार्केट भाजी मंडीत सर्व व्यवहार सुरळीत सुरू आहेत. शेतकऱ्यांनी आणलेल्या भाजीपाल्याची विक्री सुरू असून भाजी मार्केटमध्ये खरेदीदार आणि शेतकऱ्यांची गर्दीही पाहायला मिळत आहे.
दरम्यान, या बंदला नागपुरातील व्यापाऱ्यांनी आधीच विरोध दर्शविला होता. प्रशासन आणि पोलिसांनी व्यापाऱ्यांना सहकार्य करावे, असे आवाहन विदर्भातील १३ लाख किरकोळ व्यापाऱ्यांची संघटना नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष अश्विन मेहाडिया यांनी केले होते.
कोरोना लॉकडाऊननंतर आता कुठे व्यवसायाला वेग आला आहे. सणांच्या दिवसात व्यापाऱ्यांना एक दिवसही दुकान बंद ठेवणे परवडणारे नाही. कारण ऑनलाईन व्यवसाय वाढला आहे. तो एक दिवसही बंद राहत नाही. बाजारातील दुकाने बंद राहिल्यास ग्राहक ऑनलाईनकडे वळतात. त्यामुळे व्यापाऱ्यांचे आर्थिक नुकसान होत असल्याचे मेहाडिया म्हणाले होते.
तर, आंदोलनात सर्व पक्षांचे कार्यकर्ते बाजारपेठांमध्ये फिरून बळजबरीने दुकाने बंद करतात. अनेकदा संघर्षाची स्थिती निर्माण होते. अशावेळी प्रशासन आणि पोलिसांनी त्यांच्यावर आवर घालून दुकाने सुरू ठेवावीत. व्यापारी नेहमीच सरकारसोबत आहेत. उत्तर प्रदेशातील लखीमपूर-खिरी येथील घटनेचा आंदोलनाच्या माध्यमातून निषेध करावा, पण त्यासाठी व्यापाऱ्यांना टार्गेट करू नये, असे आवाहन मेहाडिया यांनी केले होते.