नागपूर- काल पनवेल येथे राष्ट्रवादीतील खासदार शरद पवार गटाचा कार्यक्रम झाला.या कार्यक्रमात खासदार अमोल कोल्हे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर जोरदार टीका केली. "शरद पवारांनी काय केलं असा जेव्हा प्रश्न विचारला जातो त्या वेळेला समोर प्रश्न विचारण्याच्या आधी कानाखाली जाळ काढावासा वाटतो", अशी टीका खासदार कोल्हे यांनी अजित पवार यांचे नाव न घेता केली, यावर आता आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनीही कोल्हे यांना प्रत्युत्तर दिले आहे.
"कानाखाली जाळ काढून विचारलं पाहिजे की..."; अमोल कोल्हेंचा अजित पवार गटावर निशाणा
"अजित दादांनी कोल्हे साहेबांना शिरुरमध्ये किती मदत केली हे त्यांना माहिती आहे. ते जर बोलले असतील तर मी त्यांच्यासाठी अजितदादांनी काय काय केलं आहे याची माहिती देतो. खासदार अमोल कोल्हे यांना त्यांनी बोलायला लावले असेल, असा आरोप आमदार अमोल मिटकरी यांनी केला. पवार साहेब यांचं आता जास्त वय झाले आहे म्हणून दादांनी त्यांना सल्ला दिला असेल. पण, साहेबांना कायम माणसात राहण्याची सवय आहे, त्यामुळे ते एकटे राहू शकत नाही. ते त्यांच्या जीवनाचे वेगळेपण आहे. साहेबांना बोलण्याचा अधिकार आहे ते मोठे आहेत, असंही आमदार मिटकरी म्हणाले.
काल शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसची ‘स्वाभिमान सभा’ आयोजित करण्यात आली होती. या सभेत बोलताना राष्ट्रवादीचे शिरूर लोकसभा मतदारसंघातील खासदार अमोल कोल्हे यांनी राष्ट्रवादीतून बंड केलेल्या नेत्यांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. "शरद पवार यांनी काय केलं, असा प्रश्न काही जणांकडून विचारला जातो. मात्र असा प्रश्न विचारणाऱ्याच्या कानाखाली जाळ काढून विचारलं पाहिजे, पवारसाहेबांनी काय नाही केलं? ईडी , सीबीआयचे ग्रहण लागले की पहिला निष्ठेला धक्का लागतो," अशा शब्दांत अमोल कोल्हे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील गटाचा समाचार घेतला.
अजित पवार गटावर निशाणा साधताना अमोल कोल्हे पुढे म्हणाले की, "आपल्यातून गेलेले नेते दिल्लीश्वरांसमोर लोटांगण घालणारे आहेत. वतनदारी वाचवण्यासाठी त्या वेळेस अनेक जण दिल्ली दरबारी मुजरा घालत होते. महाराजांनी मात्र स्वराज्याचा स्वाभिमान निवडला. दिल्लीश्वरांना प्रश्न विचारायचा स्वाभिमान यांच्यात राहिला नाही. व्यवस्थेला प्रश्न विचारायचं बंद होतं, तेव्हा अंधभक्त तयार होतात. पक्ष फोडून चाणक्य होता येत नाही तर स्वतःच्या हिंमतीवर पक्ष उभा करणारेच खरे चाणक्य आहेत," असा टोलाही कोल्हे यांनी अजित पवारांना लगावला.