नागपूर : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मारण्याची भाषा वापरणारा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर भाजपने आक्रमक भूमिका घेतली आहे. ठिकठिकाणी त्यांच्याविरोधात तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. भाजप नेते आ. चंद्रशेखर बावनकुळे यांनी कार्यकर्त्यांसह पटोलेंवर तत्काळ गुन्हा दाखल करावा अशी मागणी करत कोराडी पोलीस ठाण्यात ठिय्या दिला आहे.
एका प्रचारसभेदरम्यान पटोले यांनी 'मी मोदीला मारू शकतो व शिव्याही देऊ शकतो' असे वक्तव्य केले होते. त्याचा व्हिडीओ सर्वत्र व्हायरल झाला आहे. यानंतर, भाजपने आक्रमक भूमिका घेतली आहे. आपल्या वक्तव्याने वाद वाढल्यानंतर नाना पटोले यांनी यावर स्पष्टीकरण देताना मी गावगुंड असलेल्या मोदीबद्दल बोललो होतो, असे म्हटले आहे. काही नागरिक आमच्या परिसरातील मोदी नावाच्या गावगुंडाची तक्रार घेऊन आले होते. त्यांना तुम्ही घाबरु नका. मी तुमच्या सोबत आाहे. मोदीला मी मारु शकतो, शिव्या देऊ शकतो असे म्हटले. मी कुठेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाचा उल्लेख केला नाही. माझ्या बोलण्याचा विपर्यास केला जात आहे असे काँग्रेसचे पटोले म्हणाले.
दरम्यान, आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वात भाजपचे कार्यकर्ते पोलीस ठाण्यात दाखल झाले असून त्यांनी पटोलेविरोधात तत्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. जोपर्यंत त्यांच्यावर गुन्हे दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही पोलीस ठाण्यातून जाणार नसल्याची भूमिका बावनकुळे यांनी घेतली आहे. तर, पोलिसांनी पटोले यांच्या नागपूर निवासस्थानाबाहेर सुरक्षाव्यवस्था वाढवली आहे. पोलीस नियंत्रण कक्षाची राखीव कुमक पटोले यांच्या घरासमोर तैनात करण्यात आलेली आहे.