नागपूर : भाजपचे प्रदेश सरचिटणीस व आमदार चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांना कोरोनाची लागण झाली आहे. याबाबत त्यांनी ट्विट करत माहिती दिली. आपल्या संपर्कात आलेल्यांनी कोरोना चाचणी करून घेण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.
'माझी कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली असून मी स्वतःला घरीच आयसोलेट केले आहे . डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आवश्यक औषधोपचार व काळजी घेत आहे. अलीकडे माझ्या संपर्कात आलेल्या सर्व कार्यकर्ते व नागरिकांनी आपली चाचणी करून घ्यावी ही विनंती', असे बावनकुळेंनी ट्विट केले आहे.
आ. बावनकुळे हे गेल्या काही दिवसांपासून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ आंदोलनात सहभागी होते. रविवारीही बावनकुळे यांच्या नेतृत्वात भाजप कार्यकर्त्यांनी पटोले यांच्याविरोधात आंदोलन करत त्यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळला. यावेळी बावनकुळेंनी पटोलेंचे मानसिक संतुलन ढासळले असून त्यांना मनोरुग्णालयात दाखल करावे, या शब्दांत टीका केली होती. दरम्यान, अनेक लोकांच्या संपर्कात आले. यानंतर त्यांना कोरोनाची लागण झाली असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
शरद पवार यांना कोरोनाचा संसर्ग
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे वृत्त आज दुपारी आले. स्वत: शरद पवार यांनी ट्विट करत यासंदर्भातील माहिती दिली होती. माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. मात्र, काळजी करण्याचं कारण नाही. माझ्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मी उपचार घेत आहे. पण, गेल्या काही दिवसांपासून माझ्या संपर्कात आलेल्या लोकांनी स्वत:ची टेस्ट करावी आणि आपली काळजी घ्यावी, असे आवाहनही शरद पवार यांनी ट्विटरच्या माध्यमातून केलं होतं.