Mla Disqualification Hearing: महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू झाले आहेत. अनेकविध मुद्द्यांवरून सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने आल्याचे पाहायला मिळाले. यातच आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी नागपूर विधिमंडळात कायम ठेवण्यात आली. ठाकरे गटाची उलटतपासणी झाल्यानंतर आता शिवसेना शिंदे गटातील आमदारांची उलटतपासणी सुरू झाली आहे.
ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामत यांच्याकडून शिंदे गटाच्या आमदारांची उलटतपासणी सुरू असून आमदार दिलीप लांडे यांची पहिल्यांदा उलटतपासणी करण्यात आली. कामत यांनी प्रतिज्ञापत्रातील काही परिच्छेदांबाबत प्रश्न विचारले. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांने चालत आहे. माझ्या पक्षाने निर्देश दिले त्यांच्या विरोधात काम केले नाही. तुम्ही पक्षाच्या सदस्यत्व सोडून देईल अशी कुठलीही कृती केलेली नाही. पण तुम्ही पक्षाच्या विचारधारेनुसार काम करत असाल तर २००५ मध्ये बाळासाहेब जिवंत असताना तुम्ही पक्ष का सोडला, असा थेट सवाल करण्यात आला.
आताच्या परिस्थितीनुसार साक्ष दिली आहे
आपल्यासमोर जी साक्ष दिली आहे, ती आताच्या वस्तुस्थितीवर दिली आहे. मी साक्षीमध्ये पूर्वीची वस्तुस्थिती मांडलेली नाही. त्यामुळे आता जी वस्तुस्थिती आहे, आता हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार पुढे नेण्यासाठी आणि बाळासाहेबांनी जी शिकवण दिलेली आहे ती शिकवण आचरणात आणण्यासाठी त्या परिच्छेदात ते उत्तर दिले आहे, असे आमदार लांडे यांनी सांगितले. यानंतर तुम्ही शिवसेना राजकीय पक्ष सोडला होता अणि तुम्ही मनसे पक्षात प्रवेश केला. यावर तुम्हाला काय म्हणायचे आहे, असा प्रश्न कामत यांनी केला. त्यावर मला यावर काहीही बोलायचे नाही, असे आमदार लांडे यांनी उत्तर दिले.
बाळासाहेबांच्या शिकवणी विरोधात असलेल्या या पक्षांसोबत युती करणे मान्य आहे का?
बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांच्या विरुद्ध असलेल्या राजकीय पक्षांच्या विरुद्ध शिवसेनेने निवडणूक लढवल्या. बाळासाहेबांच्या शिकवणी विरोधात असलेल्या या पक्षांसोबत युती करणे मान्य आहे का, असे कामत यांनी विचारले. आदरणीय हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी हिंदुत्त्वाच्या रक्षणासाठी या विचारांशी सुसंगत राहूनच आदरणीय ठाकरे कुटुंबियांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवली. त्यामुळे बाळासाहेबांचे विचार सोडून काँग्रेस किंवा हिंदुत्त्वाच्या विरोधात ज्यांचे विचार आहेत अशा कोणत्याही पक्षाच्या माध्यमातून निवडणूक लढविलेली नाही. त्यामुळे बाळासाहेबांचे विचार, बाळासाहेबांची शिकवण आणि मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी हिंदुत्त्वाच्या रक्षणासाठी निवडणूक लढविलेली आहे. त्यामुळे बाळासाहेबांचे विचार आजपर्यंत आचरणात आणण्याचा प्रयत्न करत आहे, असे आमदार दिलीप लांडे यांनी सांगितले.
दरम्यान, शिवसेना राजकीय पक्षाने सध्या राष्ट्रवादीसोबत सरकार स्थापन करणे हे योग्य आहे का? असे कामत यांनी विचारले. यावर, आदरणीय हिंदूहृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी अणि हिंदुस्थान देशामध्ये हिंदुत्त्वाच्या रक्षणासाठी.... असे उत्तर देत असताना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आमदार लांडे यांना थांबवले. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी लांडे यांना उद्देशून म्हटले की, आपण फक्त शिवसेनेने राष्ट्रवादीसोबत सत्तेत राहणे योग्य की अयोग्य हे सांगा. यावर लांडे यांनी, मला माझे मत मांडू द्या असे म्हटले. त्यावर अध्यक्ष यांनी तुम्ही नीट मत मांडा, नाहीतर मला ते मराठीतून इंग्रजीत भाषांतर करताना भिरभिरत आहे, अशी मिश्किल टिप्पणी केली. या टिप्पणीने सभागृहात एकच हशा पिकला.