लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर - गैरमार्गाने मालमत्ता बळकावण्यासाठी खोटे प्रमाणपत्र देऊन शासन-प्रशासनाची फसवणूक केल्याप्रकरणी आमदार किर्तीकुमार मितेश भांगडिया (वय ३७) यांच्याविरुद्ध अखेर इमामवाडा आणि सक्करदरा पोलीस ठाण्यात शनिवारी दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले.
चिमूर (जि. चंद्रपूर) येथील आमदार असलेले भांगडिया नागपुरातील श्रीराम पॅलेस (धंतोली) मध्ये राहतात.
नागपूर सुधार प्रन्यास तर्फे उंटखाना , इमामवाडा आणि आयुर्वेदिक लेआऊट सक्करदरा येथे १३ वर्षांपूर्वी बेघर असलेल्या नागरिकांसाठी गृहप्रकल्प उभारण्यात आला होता. भांगडिया यांनी १४ मार्च २००७ ते २५ जून २००८ या कालावधीत बनावट कागदपत्रांच्या आधारे एबी ३०३ क्रमांकाचा गाळा हडपला.
त्याचप्रमाणे ५ एप्रिल २००७ ते १६ मार्च २००९ या कालावधीत सक्करदऱ्यातील गृहप्रकल्पात इमारत क्रमांक डी मध्ये २०२ क्रमांकाचा गाळा हडपला.
विशेष म्हणजे, हा गृहप्रकल्प केवळ बेघर लोकांसाठी उभारण्यात आला असल्याने आपल्याकडे कोणत्याही प्रकारचे घर, गाळे किंवा भूखंड नसल्याचे खोटे प्रतिज्ञापत्र तयार करून भांगडिया यांनी गैरमार्गाने या दोन्ही ठिकाणची मालमत्ता बळकावली. ही बनवाबनवी उघड झाल्यानंतर ॲड. तरुण चतुरभाई परमार (वय ५५, रा. भूपेशनगर, पोलीस लाईन टाकळी) यांनी संबंधित प्रशासनाकडे तक्रारी केल्या. दाद मिळत नसल्याने प्रकरण न्यायालयात गेले. उच्च न्यायालयातून या संबंधाने दणका देण्यात आल्याने अखेर शनिवारी एकाच दिवशी इमामवाडा आणि सक्करदरा या दोन्ही पोलीस ठाण्यात ॲड. परमार यांच्या तक्रारीवरून फसवणुकीचे कलम १९९, २०० आणि ४२० अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
---
अनेक दिवस टाळाटाळ
विशेष म्हणजे, आ. भांगडियांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यासंबंधीचे निर्देश काही दिवसांपूर्वीच न्यायालयाने दिले होते. मात्र, पोलिसांनी त्याकडे दुर्लक्ष करून अनेक दिवस टाळाटाळ केली. ही बाब न्यायालयाच्या लक्षात आणून दिली. प्रकरण अंगलट येऊ शकते, हे लक्षात आल्याने अखेर शनिवारी पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल केला.
---
---