नागपूर : २००५ पूर्वी अंशत: आणि विना अनुदानित तत्त्वावर नियुक्त झालेल्या व नंतर १०० टक्के अनुदानावर आलेल्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू करण्यासाठी शिक्षक आमदार नागो गाणार व पदवीधर आमदार अभिजित वंजारी यांनी पुढाकार घेतला आहे. गाणार यांनी जोपर्यंत शिक्षकांना पेन्शन मिळणार नाही, तोपर्यंत आमदारकीचे पेन्शन घेणार नाही, असे सांगितले. तर वंजारी यांनी मुंबईत आंदोलन करून शिक्षकांचा प्रश्न मार्गी लावू, असे आश्वासन दिले.
नागपूर विभागीय स्तरावर सहविचार सभेचे आयोजन संताजी सांस्कृतिक सभागृहात आयोजित करण्यात आले होते. त्यात आमदारांनी जुनी पेन्शन लागू व्हावी यासाठी पाठिंबा असल्याचे जाहीर केले. यावेळी शासनातर्फे स्थापन करण्यात आलेल्या सम्यक विचार समितीने लवकरात लवकर सकारात्मक अहवाल शासनास सादर करून १९८२ ची जुनी पेन्शन योजना लवकर लागू करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली. अध्यक्षस्थानी पुष्पलता चौधरी होत्या. संचालन आनंद नकाते, आभार देवेंद्र केदार यांनी मानले.