राष्ट्रवादी काँग्रेस - शरदचंद्र पवार या पक्षाला तुतारी हे नवे निवडणूक चिन्ह मिळाले आहे. निवडणूक आयोगाने काल (२२ फेब्रुवारी) हे चिन्ह पक्षाला बहाल केले. तुतारी चिन्ह मिळाल्यानंतर शरद पवार गटाचे नेते प्रतिक्रिया देत आहेत.
निवडणूक आयोगाने दिलेली हि तुतारी निशाणी अन्यायाविरुद्ध पेटून उठण्याचा संदेश देते, असं खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी देखील यावर प्रतिक्रिया दिली आहे. तुतारी वाजवण्यासाठीच घेतली आहे. सत्ताधारी यापेक्षा वाईट काय करू शकतात. सत्ताधाऱ्यांना राज्यातून बाहेर हाकलून लावण्यासाठी शरद पवारांनी तुतारी घेतली आहे. आनंदाच्या क्षणी तुतारी वाजवल्या जाते, हे शुभ संकेत आहे, असं विजय वडेट्टीवार म्हणाले.
वंचितलासोबत घेण्यासाठी आमचे शर्तीचे प्रयत्न सूरू आहे. त्यांच्यासोबत राहण्यासाठी ते म्हणतील त्याप्रमाणे चर्चेला तयार आहोत. प्रकाश आंबेडकर आमच्यासोबत येतील अशी आम्हाला अपेक्षा आहे. चर्चेच्या फेऱ्या शेवटपर्यंत चालत असतात, आम्ही घाई न करता आघाडीची काय भूमिका आहे. त्यावरून आमचं ठरवू, असं विजय वडेट्टीवार यांनी सांगितले. त्यांनी आज नागपूरमध्ये प्रसार माध्यमांशी संवाद साधला.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर खरा पक्ष कुणाचा हा वाद केंद्रीय निवडणूक आयोगाकडे गेला होता. त्यावर निवडणूक आयोगाने पक्षाचे मूळ नाव 'राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ हे पक्षाचे मूळ चिन्ह अजित पवार गटाला दिले होते. तर राज्यसभा निवडणुकीपूर्वी 'राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्ष' हे नाव शरद पवार गटाला दिले होते. त्यानंतर निवडणुकीसाठी शरद पवार गटाने चिन्हाची मागणी निवडणूक आयोगाकडे केली होती. त्यानुसार आयोगाने तुतारी हे चिन्ह शरद पवार गटाला दिले आहे.