लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अयोध्येत राम मंदिराच्या निर्मितीसाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषदेतर्फे वातावरण निर्मिती करण्यात येणार आहे. याअंतर्गतच येत्या २५ नोव्हेंबर रोजी अयोध्या, बंगलुरू तसेच नागपुरात हुंकार सभेच्या माध्यमातून शंखनाद करण्यात येणार आहे. संघभूमीत होणाऱ्या सभेसाठी नागपूरसह ६ लोकसभा क्षेत्रातील कार्यकर्ते येणार आहेत. विशेष म्हणजे भाजप आमदारांसह स्थानिक स्वराज्य संस्थेचे लोकप्रतिनिधीदेखील सहभागी होणार आहेत.संघाच्या विजयादशमी महोत्सवात सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी जाहीरपणे अयोध्येत राम मंदिराच्या निर्मितीबाबत संसदेत कायदा बनवण्याची मागणी केली होती. तर उत्तन येथे अखिल भारतीय कार्यकारिणी मंडळाच्या बैठकीनंतर सरकार्यवाह भय्याजी जोशी यांनी आवश्यकता भासल्यास राम मंदिरासाठी १९९२ सारखे आंदोलन करण्याचे सुतोवाच केले होते. संघश्रेष्ठींकडून मिळालेल्या सूचक संकेतानंतर संघाच्या विदर्भ प्रांताने दिवाळीच्या शुभेच्छा पत्रांमध्ये अयोध्येतील प्रस्तावित राम मंदिर आणि रामाचा फोटो असलेले संदेश वितरीत केले होते.या पार्श्वभूमीवर शनिवारी रेशीमबाग स्मृतिमंदिर परिसरातील महर्षी व्यास सभागृहात संघ परिवारातील विविध संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक झाली. सुमारे ३०० प्रतिनिधी यात सहभागी झाले होते. यात हुंकार सभेबाबत माहिती देण्यात आली. २५ नोव्हेंबर रोजी अयोध्या, बंगळुरु तसेच नागपुरात सभा होईल. त्यानंतर ९ डिसेंबर रोजी नवी दिल्ली येथे महासभा होईल.हनुमाननगरातून राममंदिराचा नवसंकल्प२५ नोव्हेंबर रोजी नागपुरातील हनुमाननगर परिसरातील क्रीडा चौकात ही हुंकार सभा होणार आहे. यात साध्वी ऋतुंभरा प्रामुख्याने उपस्थित राहतील. तसेच विश्व हिंदू परिषद, बजरंग दल इत्यादी संघाच्या सहयोगी संघटनांचे ज्येष्ठ नेते देखील या सभेला हजेरी लावणार आहे.आमदारांकडे नियोजनाची जबाबदारीहुंकार सभेसाठी ७० ते ८० हजार लोक येणे अपेक्षित आहेत. याच्या नियोजनाची जबाबदारी आमदारांकडेदेखील देण्यात आली आहे. शनिवारी झालेल्या बैठकीत यावर सखोल चर्चा झाली. यावेळी संघाचे प्रांत कार्यवाह दीपक तामशेट्टीवार , महानगर संघचालक राजेश लोया , सहसंघचालक श्रीधर गाडगे , विहिपचे प्रांत संघटन मंत्री अरुण नेटके , अजय निलदावार , सभेचे संयोजक सनत गुप्ता यांच्यासह शहरातील भाजपचे आमदारदेखील उपस्थित होते.काँग्रेस नेत्यांनी सहभागी व्हावे : मुख्यमंत्रीया हुंकार सभेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारणा केली असता हिंदू समाजाची भावना असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. अयोध्येत राम मंदिर बनावे ही सर्व हिंदूंची इच्छा आहे. यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नात आमदारांसह सर्व जण आपापल्या परीने सहभागी होण्यास स्वतंत्र आहेत. काँग्रेसच्या नेत्यांना राममंदिराच्या कार्यात सहभागी व्हायचे असेल तर त्यांचेदेखील स्वागतच केल्या जाईल. हिंदूंचा कळवळा असेल तर त्यांनीदेखील या आंदोलनात सहभागी व्हावे, असे मुख्यमंत्री म्हणाले.