लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे अंतर्गत संचालित नागपुरातील बार्टी प्रादेशिक कार्यालयाला आंध्रप्रदेशातील आमदारांच्या शिष्टमंडळाने सदिच्छा भेट दिली. तसेच बार्टीच्या आयबीपीएस सेंटरला भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला. या दरम्यान त्यांनी बार्टीची कार्यपद्धती जाणून घेतली.आंध्रप्रदेशतील मदाकासीरा अनंतपूर येथील आमदार एम.एस.राजु, नंदीकोटकूर कर्नूल येथील आमदार जय सुर्या, कोडमूर कर्नूल येथील बी. दस्तगीरी, पूथलपट्टू चिलकुर येथील आमदार मुरली, पार्वतीपुरम विजयनगरम येथील आमदार विजया चंद्रा आमदारांच्या या शिष्टमंडळाने बार्टी प्रादेशिक कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. यावेळी प्रकल्प व्यवस्थापक अनिल वाळके यांनी सर्वांचे स्वागत केले. बार्टीची संशोधन आणि प्रशिक्षण योजनेची कार्यपध्दती समजावून सांगितली.
शिष्टमंडळाने बार्टीच्या अधिकाऱ्यांसह अनुसूचित जातीत समाविष्ट असलेल्या वेगवेगळ्या घटाकांसाठी बार्टी मार्फत सुरु असलेल्या प्रकल्पांवर चर्चा केली. यावेळी त्यांना बार्टी अंतर्गत चालविण्यात येणाऱ्या विविध संशोधन व प्रशिक्षण योजनांबद्दल माहिती देण्यात आली.
शिष्टमंडळाने बार्टी प्रादेशिक कार्यालया मार्फत चालविण्यात येणाऱ्या आयबीपीएस सेंटरला भेट देऊन आयबीपीएस पूर्व प्रशिक्षण योजने संदर्भात माहिती जाणून घेतली. उपस्थित विद्यार्थ्यांशी संवाद साधला. याप्रसंगी बार्टीचे प्रकल्प अधिकारी सुनीता झाडे, तुषार सुर्यवंशी, शीतल गडलिंग, हृदय गोडबोले, प्रकल्प समन्वयक नागेश वाहुरवाघ, खुशाल ढाक, सहायक प्रकल्प अधिकारी सरीता महाजन, मंगेश चहांदे उपस्थित होते.