नागपूर : महाविकास आघाडीच्या १६ एप्रिल रोजी आयोजित सभेवरून राजकारण तापायला लागले आहे. दर्शन कॉलनीतील मैदान देण्यास भाजपचे आमदार कृष्णा खोपडे व माजी नगरसेवक हरीश डिकोंडवार यांनी विरोध केला. मात्र भाजपच्या शहराध्यक्षांनी मात्र ही सभा तेथे होऊ देण्यास काहीच हरकत नसल्याचे म्हटले आहे. त्यामुळे या सभेबाबत भाजपची नेमकी भूमिका काय असा प्रश्न उपस्थित होत आहे.
महाविकास आघाडीने १६ एप्रिल रोजी सायंकाळी ४ वाजता दर्शन कॉलनी मैदानावर ‘वज्रमूठ सभा’ आयोजित केली आहे. या सभेसाठी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह काँग्रेस - राष्ट्रवादीचे नेतेही येणार आहेत. ही सभा पूर्व नागपुरातील दर्शन कॉलनीतील मैदानात आयोजित करण्याची परवानगी मागण्यात आली होती व नासुप्रने लेखी परवानगी दिली. हे खेळाचे मैदान असून राजकीय सभेमुळे ते खराब होईल, असा आक्षेप स्थानिक नागरिकांनी घेतला व तसे पत्र आ.कृष्णा खोपडे यांना दिले. त्यानंतर खोपडे व डिकोंडवार यांनी नासुप्र सभापतींना पत्र दिले व महाविकास आघाडीच्या सभेसाठी दिलेली परवानगी रद्द करण्यात यावी, अशी मागणी केली. यावरून महाविकास आघाडीच्या नेत्यांनी भाजपवर टीका करण्यास सुरुवात केली. या सभेबाबत भाजपचे शहराध्यक्ष आ.प्रवीण दटके यांना विचारणा केली असता वज्रमूठ सभेला आमचा कुठलाही विरोध नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
दर्शन कॉलनीतील सभेला आमचा विरोध नाही. आ.खोपडे यांनी नागरिकांच्या मागणीचे पत्र अधिकाऱ्यांना दिले. याचा अर्थ विरोध होतो असा नाही, असे आ.दटके यांनी सांगितले. आता आमदारांनी पाठविलेले पत्र आणि दुसऱ्याच दिवशी शहराध्यक्षांनी मांडलेली भूमिका यावरून विविध प्रश्न उपस्थित होत आहेत.