आॅनलाईन लोकमतनागपूर : शहरातील एका आमदाराच्या लहान बहिणीला कौटुंबिक कलहातून मारहाण केल्याची घटना घडली आहे. फिर्यादी महिलेला शुक्रवारी उपचारानंतर आरोपी पतीविरुद्ध तक्रार दाखल करण्यासाठी पाच तास पोलीस ठाण्यात बसून रहावे लागले. ही घटना सोनेगाव पोलीस ठाण्यात घडली.तक्रारकर्ता सारिका निमजे यांच्यानुसार त्या शुक्रवारी दुपारी १ वाजता उपचाराचे कागदपत्र घेऊन तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात पोहोचल्या. त्यांनी पोलिसांना आपण आमदाराची बहीण असल्याचे सांगितले. परंतु त्यांना वारंवार वैद्यकीय अहवालाची झेरॉक्स आणण्यास सांगून सायंकाळी ६ वाजेपर्यंत ठाण्यात बसवून ठेवण्यात आले. कौटुंबिक कलहात त्रस्त असलेली सारिका निमजे (३७) ही महिला मध्य नागपूरचे आमदार विकास कुंभारे यांची लहान बहीण आहे. सारिकाचे लग्न २००० मध्ये खामला रोड, वेलकम सोसायटी येथील रहिवासी जयंत अरविंद निमजे (४२) याच्याशी झाले होते. त्यांना एक १५ वर्षाचा मुलगा आणि ८ वर्षाची मुलगी आहे. मागील ७-८ महिन्यापासून पती जयंतने दारूच्या व्यसनामुळे व्यवसायाकडे लक्ष देणे बंद केले. मुलांच्या पालन पोषणाची जबाबदारी सारिकावर आली. सारिका ब्युटी पार्लर चालवून मुलांचे पालनपोषण करीत होती. परंतु पती जयंत नेहमीच सारिकाला दारूच्या नशेत मारहाण करायचा. याची माहिती सारिकाने आपल्या माहेरच्या मंडळीला दिली. परंतु माहेरच्यांनी तिला संयम ठेवण्यास सांगितल्याने ती पतीचा अत्याचार सहन करीत होती. महिनाभरापासून कौटुंबिक कलहाचे प्रकरण पोलीस विभागाच्या भरोसा सेलमध्ये सुरू होते. परंतु पती जयंतच्या वागणुकीत बदल झाला नाही. बुधवारी ३ जानेवारीला रात्री सारिका ७.३० वाजता ब्युटी पार्लरमधुन घरी आली. ती स्वयंपाक तयार करीत होती. दरम्यान दारूच्या नशेत पती जयंत घरी पोहोचला. जयंतने सारिकाला शिवीगाळ करून भरोसा सेलमध्ये सुरू असलेली केस परत घेण्यासाठी धमकावले आणि केलेला स्वयंपाक फेकण्यास सुरुवात केली. हे पाहून संतप्त झालेल्या मुलाने रागाने ओरडून वडिलांना शांत राहण्यास सांगितले. परंतु जयंतने मुलाला चापट मारली. पत्नी सारिकाने त्याला समजविण्याचा प्रयत्न केला असता त्याने सराट्याने सारिकाच्या पाठीवर आणि डोक्यावर वार करून तिला जखमी केले. अखेर सासू, सासरा आणि शेजाऱ्यांनी जखमी सारिकाला खामलाच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी भरती केले. शुक्रवारी ५ जानेवारीला हॉस्पिटलमधून तिला सुटी देण्यात आली. त्यानंतर सारिका मुलगी शाळेतून परतल्यानंतर पतीविरुद्ध तक्रार नोंदविण्यासाठी पोलीस ठाण्यात पोहोचली.