शहराचे विद्रुपीकरण खपवून घेणार नाहीलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ज्योतिषाद्वारे स्वत:च्या जाहिरातीसाठी शहरात ठिकठिकाणी पोस्टर्स लावून केलेल्या विद्रुपीकरणाबाबत लोकमतने वृत्त प्रकाशित करताच जनमानसामधून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने याचा निषेध केला व पांढऱ्या रंगाने या जाहिराती मिटविल्या.मंगळवारी मनसेचे प्रदेश सरचिटणीस हेमंत गडकरी यांच्या नेतृत्वात पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सीताबर्डी उड्डाण पुलाच्या पिलरवरच्या जाहिराती काढल्या. कार्यकर्त्यांनी गांधीगिरी करीत या पोस्टर्सवर चुना लावून रंगरंगोटी केली. यावेळी मनसेचे मध्य विभाग अध्यक्ष प्रशांत निकम, शहर सचिव श्याम पुनियानी, दक्षिण नागपूर अध्यक्ष विक्की कोरडे, अभय व्यवहारे, दीपक लाडुकर आदी पदाधिकारी व कार्यकर्ता सहभागी झाले. हेमंत गडकरी यांनी शहरातील अवैध पोस्टर्सविरोधात लोकमतने चालविलेल्या अभियानाला मनसे कार्यकर्त्यांचा मनातून पाठिंबा असल्याचे ते म्हणाले. महापालिकेनेही कुणाच्या दबावात न येता अशा लोकांविरोधात कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली.तर चेहऱ्याला काळे फासूअसे विद्रुपीकरण करणाऱ्यांना धडा शिकवू, असा इशारा त्यांनी दिला. आज गांधीगिरी करून रस्त्यावरील पोस्टर्सना चुना मारला आहे, मात्र परत असा प्रकार केल्यास घरात घुसून चेहऱ्याला काळे फासू, असा इशारा हेमंत गडकरी यांनी यावेळी दिला.अंनिसचे ज्योतिषाला आव्हानशहराच्या सौंदर्यात विघ्न ठरलेल्या ज्योतिषाच्या पोस्टरबाजीवर सर्वच स्तरातून तीव्र संताप व्यक्त होत असताना अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीनेही त्याच्या कृतीवर टीका केली आहे. लोकमतच्या वृत्तानंतर ज्योतिषाने जाहिरातीमध्ये दिलेल्या मोबाईल क्रमांकावर संपर्क करीत ज्योतिष हे शास्त्र आहे हे सिद्ध करण्याचे आव्हान अंनिसने केले. या ज्योतिषाने २० लोकांच्या कुंडल्यावरून संबंधित व्यक्ती मृत की जिवंत आहे आणि स्त्री कि पुरुष आहे, याचे सत्य सांगितले तर अ.भा. अंनिसतर्फे त्याला २५ लाख रुपये देण्यात येतील, असेही आव्हान केल्याचे अंनिसचे राष्ट्रीय महासचिव हरीश देशमुख यांनी पत्रकाद्वारे नमूद केले. समितीने याबाबत आमदार सुधाकर कोहळे यांच्याशी संपर्क केला असून त्यांनीही मनपाद्वारे या ज्योतिषावर कारवाई करण्याचे आश्वासन दिले असल्याचे देशमुख यांनी पत्रकात स्पष्ट केले.
मनसेने पुसले ज्योतिषाचे भविष्य
By admin | Published: July 05, 2017 1:47 AM