नागपूर : महाराष्ट्र नवनिर्माण पक्षाचे नेते राज ठाकरे आज शुक्रवारी नागपुरात दाखल झाले आहेत. त्यांच्या स्वागतासाठी नागपूर विमानतळावर कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली. या एक दिवसीय दौऱ्यात त्यांच्या उपस्थितीत विदर्भातील पदाधिकाऱ्यांची बैठक होणार असून नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तिपत्रांचे वितरण करणार आहेत.
आज सकाळी साडेअकरा दरम्यान त्यांचे विमानाने आगमन झाले असून अधिवेशन काळातच त्यांचा दौरा होत असल्यामुळे पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. मागील महिन्यात मनसेमध्ये झालेल्या फेरबदलानंतर त्यांचा हा पहिलाच दौरा आहे.
आज वसंतराव देशपांडे सभागृहात आयोजित मेळाव्यात ते नवनियुक्त पदाधिकाऱ्यांची भेट घेणार असून नियुक्तिपत्रे देणार आहेत. आगामी महानगरपालिका निवडणुका आणि विदर्भातील जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा दौरा महत्त्वाचा मानला जात आहे.