Raj Thckeray ( Marathi News ) : राज्यात काही दिवसातच विधानसभा निवडणुका जाहीर होणार आहेत, या पार्श्वभूमीवर मनसे प्रमुख राज ठाकरे आज नागपूर दौऱ्यावर आहेत. दरम्यान, त्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी महायुती सरकारसह खासदार शरद पवार यांच्यावर निशाणा साधला.
राज ठाकरे यांनी 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवरुन महायुती सरकारवर टीका करत सवाल उपस्थित केला. लाडकी बहीण योजनेवर बोलताना ठाकरे म्हणाले, लोकांना तुम्ही कामाला लावा. लोक काम मागत आहेत. फुकटचे पैसे मागत नाहीत, शेतकरी फुकटची वीज मागत नाहीत. तुम्ही पहिल्यांदा लोकांच्या मागण्या समजून तर घ्या. मला वाटतंय आता पहिला महिना जाईल, दुसरा महिनाही कदाचित जाईल. सरकारकडे पैसे कुठे आहेत, असा सवालही राज ठाकरे यांनी केला. "याच्यामध्ये अजितदादांनी सांगितले आहे का निवडून दिलं तरच पुढचं, तसं होणार नाही ते. सरकारकडे पैसे तर पाहिजेत?, असंही राज ठाकरे म्हणाले.
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! केंद्राने युनिफाइड पेन्शन योजनेला दिली मंजुरी
'मी कायद्याचा धाक दाखवेन'
राज्यातील जनतेने ४८ तासांचा अवधी दिल्यास संपूर्ण महाराष्ट्राला गुन्हेगारमुक्त करू, असंही राज ठाकरे म्हणाले. 'राज ठाकरेंच्या हातात सत्ता दिली की दाखवेन सरकार कसं चालतं?' कायद्याचा धाक म्हणजे काय हे मी दाखवून देईन. यानंतर महाराष्ट्रात कोणीही स्त्रीकडे घाणेरड्या नजरेने पाहण्याची हिंमत करणार नाही, असंही ठाकरे म्हणाले.
महाविकास आघाडीवर निशाणा
यावेळी राज ठाकरे यांनी महाविकास आघाडीतील नेत्यांवरही टीका केली. उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील पक्षांना विधानसभा निवडणुकीत सत्ताविरोधी मते मिळणार नाहीत, दलित आणि मुस्लिमांच्या मोठ्या वर्गाने भाजपच्या विरोधात मतदान केले. ही मते पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या विरोधात उद्धव ठाकरे, शरद पवार आणि काँग्रेसकडे गेली. ही मते महाविकास आघाडीची नव्हती. ही लाट आता संपली आहे, असंही राज ठाकरे म्हणाले.
खासदार शरद पवारांवर आरोप
आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मनसे २२५ जागा लढवणार असल्याचे राज ठाकरे यांनी सांगितले. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण २८८ जागा आहेत. यावेळी खासदार शरद पवार यांच्यावर आरोप केले. ठाकरे म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस ( शरद पवार गट) अध्यक्षांनीच राज्यात जातीचे आणि पक्षांतराचे राजकारण आणले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतर संतांमध्येही जातीच्या आधारावर फूट पडल्याचा आरोप त्यांनी केला.