मनसे प्रमुख राज ठाकरे पाच दिवसांच्या विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. दौऱ्यात राज ठाकरेंनी रविवारी आणि सोमवारी नागपुरात पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. त्यानंतर आज दुपारी त्यांनी पत्रकार परिषद घेतली. राज ठाकरेंनी नागपुरातील मनसेची सर्व महत्वाची पदं बरखास्त करत असल्याची घोषणा केली. घटस्थापनेला नवं पदाधिकारी आणि कार्यकारिणी जाहीर करेन, असं राज ठाकरेंनी पत्रकार परिषदेत म्हटलं.
राज ठाकरेंना या पत्रकार परिषदेत विविध विषयांवर भाष्य केलं. यामध्ये कोरोनंतरचा हा माझा पहिलाच दौरा आहे. थोडक्यात बऱ्याच काळाने मी नागपुरात आणि विदर्भात आलो आहे. मी नागपूर आणि विदर्भातील एकूणच पक्षबांधणीचा आणि संघटनात्मक कामाचा आढावा घ्यायला आलो आहे. गेल्या १६ वर्षात मला जसं संघटनात्मक बांधणी अपेक्षित होती, तशी इथे झाली नाही. त्यामुळेच आता नवीन तरुण-तरुणींना जे होतकरू आहेत अशांना संधी द्यायचा मी निर्णय घेतला आहे, असं राज ठाकरेंनी सांगितलं.
भाजपा आणि मनसे युती होणार अशी गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरु आहे. मात्र आजच्या पत्रकार परिषदेत राज ठाकरेंनी एक महत्वाचं विधान केलं आहे. मी काल एक वाक्य बोललो की, प्रस्थापितांच्या विरोधात लढूनच तुम्ही मोठे होता. एकेकाळी विदर्भ हा काँग्रेसचा बालेकिल्ला होता. भाजपाने अनेक वर्ष काँग्रेसच्या विरोधात म्हणजे प्रस्थापितांच्या विरोधात लढून मुसंडी मारली. उद्या जर विदर्भात पक्ष रुजवायचा असेल, तर तिथल्या प्रस्थापितांच्या विरोधात लढावं लागेल. बरं हे करताना व्यक्तिगत संबंध आणि राजकीय भूमिका ह्यात गल्लत करू नका. राजकारणात विरोध हा मुद्द्यांना असतो, व्यक्तीला नसतो. त्यामुळे ह्यात कोणी गल्लत करू नये, असं राज ठाकरेंनी म्हटलं.
दरम्यान, महाराष्ट्रात गेल्या काही वर्षात राजकारणात जे सुरु आहे, ते अभूतपूर्व आहे. मतदारांशी जी प्रतारणा सुरु आहे ती आजपर्यंत महाराष्ट्राने कधीच अनुभवली नाही. निवडणुकीत ज्या युत्या आणि आघाड्या होतात त्या सोईस्करपणे निवडणुकीनंतर तोडल्या जातात, कशासाठी तर सत्तेच्या स्वार्थासाठी. महाराष्ट्रातील जनतेला आपण गृहीत धरू शकतो ह्याची खात्री पटल्यामुळेच हे सुरु असल्याचं राज ठाकरेंनी यावेळी स्पष्ट केलं.
फुकट देणं या गोष्टींना माझा विरोध- राज ठाकरे
लोकांना पाणी फुकट देणं, वीज फुकट देणं ह्या असल्या गोष्टींना माझा विरोध आहे. फुकट हवं अशी लोकांची पण अपेक्षा नसते. लोकं म्हणतात जे द्याल ते माफक दरात द्या, योग्य प्रमाणत द्या आणि वेळेत द्या. ह्या असल्या फुकट देण्याच्या राजकारणात तात्कालिक फायदा एखाद्या पक्षाला होईल पण दीर्घकालीन नुकसान हे त्या राज्याच्या अर्थव्यवस्थेचं आहे, असं राज ठाकरेंनी यावेळी सांगितलं.