मनसे प्रमुख राज ठाकरे पाच दिवसांच्या विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. दौऱ्यात राज ठाकरेंनी रविवारी आणि सोमवारी नागपुरात पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. त्यानंतर आज दुपारी १२ वाजता पत्रकार परिषद घेतली. राज ठाकरेंनी नागपुरातील मनसेची सर्व महत्वाची पदं बरखास्त करत असल्याची घोषणा केली. घटस्थापनेला नवं पदाधिकारी आणि कार्यकारिणी जाहीर करेन, असं राज ठाकरेंनी पत्रकार परिषदेत म्हटलं.
राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेच्या सुरुवातीलाच नागपुरातील मनसेच्या सर्व महत्वाची पदं बरखास्त करण्यात येत असल्याचा निर्णय जाहीर केला. "नागपूर शहर आणि जिल्ह्यातील आमचे जे काही सेल्स आहेत. महत्वाची पदं आहेत ती बरखास्त करत आहे. घटस्थापनेच्या दिवशी नवी कार्यकारणी जाहीर करेन. आता २७ सप्टेंबरला पदाधिकाऱ्यांची मुंबईत बैठक आहे. त्यानंतर २८ तारखेला आमचे काही नेते नागपूरात येतील. नवरात्रीनंतर मी कोल्हापूरमार्गे कोकण दौरा करणार आहे. त्यानंतर दोन दिवसांसाठी मी पुन्हा नागपुरात पक्ष बांधणीसाठी येणार आहे", असं राज ठाकरे म्हणाले.
होय...माझ्याकडून दुर्लक्ष झालं, पण यापुढे होणार नाही; राज ठाकरेंनी दिली कबुली!
राज ठाकरेंना या पत्रकार परिषदेत विविध विषयांवर भाष्य केलं. यामध्ये पत्रकारांनी राज ठाकरेंना विचारले की, शिंदे गटातील नेते रामदास कदम म्हणाले, उद्धव ठाकरेंना वारंवार सांगावं लागतं की, ते बाळासाहेब ठाकरेंचे पुत्र आहेत. तसेच बाळासाहेब कधीही सार्वजनिक मंचावर दिसायचे नाही. मात्र उद्धव ठाकरेंच्या पत्नी रश्मी ठाकरे या वारंवार सगळ्या ठिकाणी दिसतात. यावर तुम्ही हा प्रश्न रामदास कदम किंवा उद्धव ठाकरे आल्यावर विचारा. माझा या गोष्टींशी काहीही संबंध नाही, असं राज ठाकरेंनी सांगितलं.
दरम्यान, मी उद्धव ठाकरेंना सांगेन की शिवसेना तुम्ही नाही उभी केली. अनेक शिवसैनिकांचे खून पडलेत. अनेकांना जेलमध्ये जावं लागलं, जीवन उद्ध्वस्त झालं, संसार उद्ध्वस्त झालेत. तुमचं काय योगदान? वारंवार सांगतात मी बाळासाहेबांचा मुलगा. अरे हो कितीवेळा सांगशील. आम्ही कधी नाही म्हटलंय का? उद्धव ठाकरे बाळासाहेबांचा मुलगा नाही असं आम्ही म्हटलं का कधी? तुम्हाला काय संशय आहे काय? अरे आहेस ना तू त्यांचा मुलगा ते सांगायला कशाला लागतंय. तुझ्यामध्ये काही कर्तृत्व आहे का?", अशी घणाघाती टीका रामदास कदम यांनी केली.
आदित्य ठाकरेंनी आधी लग्न करावं-
रामदास कदम यांनी यावेळी आदित्य ठाकरेंनाही टोला लगावला. "जगातला पहिला प्लास्टिक बंदीचा कायदा मी केला. जसा कायदा केला तसं आदित्य टूनटून उड्यामारुन मी केला, मी केला म्हणून ओरडू लागले. अरे तू काय केलं. तू अजून लग्न केलं नाही तू काय करणार आहेस. बाप मुख्यमंत्री, मुलगा कॅबिनेट मंत्री आणि मला काका-काका बोलून माझ्या जागेवर जाऊन बसला याला खरी गद्दारी म्हणतात", असं रामदास कदम म्हणाले.