नागपूर : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नागपुरात आयोजित पत्रपरिषदेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. उद्धव ठाकरेंनी जनतेच्या मतदानाचा अपमान केल्याचे राज ठाकरे म्हणाले. अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रिपदाचं ठरलं होतं तर तेव्हाच का नाही बोललात, अशी टीकाही त्यांनी केली. निवडणुका झाल्या, निकाल लागले आणि मग यांना आठवलं. लोकांनी काय फक्त खेळ पाहत राहायचं का? दोन तास रांगेत, उन्हात उभं राहून मतदान करायचं आणि हे वाटेल तशी प्रतारणा करणार. त्यामुळे हा प्रश्न फक्त विदर्भापुरता मर्यादित नाही, तर महाराष्ट्राचा आहे. ज्या लोकांनी मतदान केलं आहे, त्यांचा अपमान केला आहे. या सर्व गोष्टी त्यांच्यासमोर घेऊन जाणं महत्त्वाचं आहे
राजकारणाची पातळी खालावण्यासाठी कोण जबाबदार? असा प्रश्न विचारण्यात आला असता, इतक्या प्रकारे अपमान केल्यानंतरही लोक जेव्हा त्यांनाच मतदान करतात, तेव्हा आपण केलं ते बरोबर आहे असं त्यांना वाटतं. लोकांनी यांना शासन करणं, निवडणुकीत धक्का देण्याची गरज आहे, तेव्हाच हे सुधारतील. जर अशाप्रकारे अपमान होत असेल तर वठणीवर आणलं पाहिजे, असे उत्तर राज ठाकरेंनी दिले.
सध्या राजकारणात वैयक्तिक टीका सर्वाधिक होतेय. राजकारण वैयक्तिक नसतं, वैचारिक धोणांवर टीका करतो, अशी प्रतिक्रिया राज ठाकरे यांनी दिली. राजकरणात मी मोदींच्या धोरणावर टीका केली, मोदींवर कधीही वैयक्तिक टीका केलेली नाही, असंही त्यांनी सांगितलं. तसेच मनसेने मविआ सरकारचं कधीच कौतुक केलं नाही. सत्ताधाऱ्यांविरोधात लढूनच पक्ष मोठा होत असतो, असेही ठाकरे म्हणाले.
इतका गोंधळ, इतकी प्रतारणा आजपर्यंत पाहिलेली नाही
महाराष्ट्राच्या राजकारणात मी इतका गोंधळ आणि इतकी प्रतारणा आजपर्यंत पाहिलेली नाही. कोण कोणासोबत जात आहे आणि कोण सत्ता स्थापन करत आहे, विरोधी पक्षात कोण बसत आहे यावर इतका गोंधळ मी इतक्या वर्षांच्या राजकारणात पाहिलेला नाही, असा संतापही त्यांनी व्यक्त केला.
फॉक्सकॉन प्रकरणावरून राज ठाकरेंचा हल्लाबोल
वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला गेला यावरुन राज्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू आहेत. राज ठाकरे यांनी यावर भाष्य करत एक प्रश्न उपस्थित केला. राज्यात आलेला उद्योग बाहेर जातोच कसा? फॉस्ककॉन प्रकरणाची चौकशी व्हावी, असे ठाकरे म्हणाले. या प्रकरणात पैशांची मागणी केली गेली आहे का याचीही चौकशी व्हावी. सत्य लोकांसमोर यायला हवं, असंही ते म्हणाले. गुजरातने कदाचित चांगली ऑफर दिली असावी, असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.