नागपूर : शहरातील बहुतांश भागात नागरिकांना पिण्याच्या पाण्याच्या अपुरा पुरवठा होत असल्याबाबत महापालिका आयुक्तांकडे तक्रारी करण्यात आल्या. पत्र देऊन भेटीची वेळ मागण्यात आली. मात्र, सुमारे दहावेळा पत्र दिल्यानंतरही आयुक्त भेटीची वेळ देत नाहीत म्हणून मनसे कार्यकर्ते संतापले. सोमवारी मनसे कायर्कर्त्यांनी आयुक्त कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करीत टाळ-मृदंग वाजवत प्रशासनाचा निषेध नोंदवला.
मनसेचे शहर अध्यक्ष विशाल बडगे व चंदू लाडे यांच्या नेतृत्वात कार्यकर्ते मनपा आयुक्त कार्यालयासमोर जमले. शहरात अपुरा पाणीपुरवठा होत असून, महापालिका प्रशसनाकडे तक्रार करूनही लक्ष दिले जात नसल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केला. यावेळी महापालिका प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. आयुक्त हे फक्त सत्ताधाऱ्यांचेच आहेत का, शहरातील उर्वरित जनता वाऱ्यावर सोडली का, वारंवार पत्र देऊनही आयुक्त भेटीसाठी वेळ का देत नाहीत?, असा सवाल यावेळी करण्यात आला. आंदोलकांना ताब्यात घेण्यासाठी पोलिस पोहोचले असता, कार्यकर्त्यांनी विरोध केला. यामुळे काही वेळ तणाव निर्माण झाला. शेवटी पाणी प्रश्नावरील सर्व मागण्या ऐकून घेण्यासाठी आयुक्तांनी २५ एप्रिल रोजी वेळ देण्याचे आश्वासन दिले. यानंतर आंदोलक नमले.