नागपूर : हनुमान चालिसा पठणाच्या मुद्द्यावरून मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून मनसैनिकांच्या धरपकडीवर नाराजी व्यक्त केल्याने राजकारण तापले आहे. या पार्श्वभूमीवर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी गुन्हे दाखल झालेल्या मनसे नेत्यांनी शरण यावे, अशी भूमिका मांडली आहे. मंगळवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर बोलत होते.
आरोपीला शोधणे हे पोलिसांचा कामच आहे. कायदा व सुव्यवस्थेच्या मुद्द्यावर पोलीस आपले काम करीत आहे. ज्या मनसे नेत्यावर गुन्हे दाखल झालेले आहेत, त्यांनी ताबडतोब पोलिसांकडे शरण आले पाहिजे. त्यांनी तातडीने पोलिसांसमोर उपस्थित व्हावे, असे त्यांनी स्पष्ट केले. मनसे नेत्यांसोबत कशी वागणूक केली पाहिजे याचा मार्गदर्शन आता राज ठाकरेंनीच करायला हवे. पोलीस कायद्याप्रमाणे आपले काम करीत असतात व त्यात गैर काहीही नाही. पोलीस आपल्या पद्धतीनेच काम करणार, त्यामुळे कुणीही नाराज होण्याचे कारण नाही, असे ते म्हणाले.
नागपुरातील स्फोटकांबाबत स्पष्टता नाही
नागपूर रेल्वेस्थानकावर आढळलेल्या स्फोटकांवरदेखील त्यांनी भाष्य केले. या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे. मात्र, अद्यापपर्यंत स्फोटकांबाबत तपासात स्पष्टता आलेली नाही, असे त्यांनी सांगितले.