नागपूर : नागपूरकरांना २४ तास पाणीपुरवठ्याचे स्वप्न दाखवून सुरू करण्यात आलेली २४ बाय ७ योजना पूर्णपणे फसली आहे. ओसीडब्ल्यू कंपनीतर्फे ७५ टक्के नागपूरकरांना नियमित पाणीपुरवठा होत नाही. अशा कंपनीला पुन्हा किती संधी देणार, असा सवाल करीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे २ जून रोजी ओसीडब्ल्यू विरोधात महापालिकेवर मोर्चा काढण्याची घोषणा करण्यात आली.
मनसेचे शहर अध्यक्ष विशाल बडगे, चंदू लाडे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, ओसीडब्ल्यु या कंपनीला राजकीय राजाश्रय आहे. त्यामुळे ही कंपनी महापालिकेत अधिकाऱ्यांनी दिलेल्या सूचनांचेही पालन करीत नाही. ओसीडब्ल्युच्या मुद्यावर महापालिका आयुक्तांना चर्चेसाठी वेळ मागितली असता त्यांनी तीन महिने टाळाटाळ केली. या उन्हाळ्यात शहरातील बहुतांश भागात नळाद्वारे पुरेसे पिण्याचे पाणी मिळाले नाही. गळती, दुरुस्तीच्या नावावर अपुरा पाणीपुरवठा होत आहे. तक्रारी करूनही कुणी दखल घेत नाही. त्यामुळे या कंपनीचा कंत्राट तत्काळ रद्द करून काळ्या यादीत टाकावे, अशी मागणीही यावेळी मनसेतर्फे करण्यात आली.
ओसीडब्ल्यूची वरात मनपाच्या दारातमहापालिका प्रशासन हे ओसीडब्ल्यू कंपनीला जावयासारखी वागणूक देत आहे. कुठलीही कारवाई करीत नाही, असे सांगत ओसीडब्ल्यूची वरात मनपाच्या दारात नेत आहोत, असा चिमटाही मनसेतर्फे घेण्यात आला आहे.