नागपूर : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत घोषणाबाजी केली आणि एसटीचे विलिनीकरण करण्याच्या कर्मचाऱ्यांच्या प्रमुख मागणीला समर्थन देत या लढ्यात कर्मचाऱ्यांच्या पाठीशी उभे असल्याचे सांगितले.
मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी दोन दिवसांपूर्वी या आंदोलनाला पाठिंबा दर्शवून आंदोलकांच्या पाठीशी उभे राण्याचे आवाहन मनसेच्या कार्यकर्त्यांना केले होते. यानंतर गणेशपेठ आगारात संपावर बसलेल्या कर्मचाऱ्यांची मनसेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी भेट घेतली व उपोषणस्थळी घोषणा देत संपावर बसलेल्या कर्मचाऱ्यांना समर्थन दर्शविले.
एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या योग्य आहेत. वर्षानुवर्षे एसटी कामगार सरकार आणि महामंडळाच्या दडपशाहीचा बळी ठरला आहे. आता मात्र कर्मचाऱ्यांच्या सहनशीलतेचा अंत झाला आहे. एसटी कामगार जगला तरच एसटी जगेल हे समजून घेण्याची वेळ आली आहे, असे प्रतिपादन यावेळी मनसे प्रदेश सरचिटणीस हेमंत गडकरी यांनी केले. यावेळी नागपूर मनसे परिवहन सेनेचे पदाधिकारी राम मांडवगडे यांनी मनसे पदाधिकाऱ्यांना एसटी कर्मचाऱ्यांच्या समस्यांबद्दल माहिती दिली. मनसे शहराध्यक्ष अजय ढोके व विशाल बडगे यांनीही मनोगत व्यक्त केले.