नागपूर : मराठी फलक लावण्यावरून नागपुरात मनसे आक्रमक झाली आहे. या मागणीसाठी आज गुरुवारी सकाळी नागपुरात मनसे महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं. वारंवार सांगुनही मराठी फलक लावण्यात येत नसेल, तर आम्ही कठोर भूमिका घेऊ, असा इशारा या कार्यकर्त्यांनी दिला.
राज्यातील आस्थापना, दुकानांवर मराठी पाटी लावणं बंधनकारक असल्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला. मात्र, अनेक दुकानाबाहेरील पाट्या मराठीत नाही. या मुद्द्यावरून आज सकाळी शहरातील रेल्वे स्थानकाबाहेरील हल्दीराम दुकानासमोर मनसेच्या महिला कार्यकत्या आक्रमक झाल्या. मनसे महिला सेना शहराध्यक्ष मनिषा पापडकर यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आलं.
शहरातील सर्वच आस्थापना, दुकानाबाहेरील इंग्रजीतला फलक काढून मराठीतील फलक लावण्यात यावा, ही मागणी त्यांनी या आंदोलनातून केली आहे. हे लवकरात लवकर न केल्यास मनसेतर्फे कठोर पाऊल उचलण्यात येईल, असा इशारा पापडकर यांनी दिला.
याबाबत आधीही निवेदन देण्यात आले आहे. परंतु, वारंवार निवेदन देऊनही ऐकले जात नसेल तर, दुकानाच्या काचा फोडण्यात येईल, फलकावर काळं फासण्यात येईल अशी धमकीही कार्यकर्त्यांनी यावेळी दिली. याबाबत हल्दीराम दुकानातील कर्मचाऱ्यांना विचारणा केली असता, त्यांनी मराठी फलक लवकरच लावण्यात येणार असल्याचे सांगितले.