नागपूर : राज्यातील मंदिरे, प्रार्थनास्थळे उघडण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने शनिवारी टेकडी गणेशाला साकडे घातले. मंदिरे उघडण्यासाठी या सरकारला सद्बुद्धी दे, अशी श्रीचरणी प्रार्थना केली. मंदिरांवर अवलंबून असलेल्या, बाहेर हारफूल विकणाऱ्यांनी आता चोऱ्या करायच्या का, असा सवालही मनसेतर्फे सरकारला करण्यात आला.
मनसेचे प्रदेश सरचिटणीस हेमंत गडकरी यांच्या नेतृत्वात टेकडी गणेश मंदिराच्या प्रवेशद्वारावर घंटानाद आंदोलन झाले. यावेळी शहर अध्यक्ष अजय ढोके व विशाल बडगे, उप शहर अध्यक्ष प्रशांत निकम, रजनीकांत जिचकार, जिल्हा अध्यक्ष किशोर सरायकर, महिला सेना जिल्हा अध्यक्ष अचला मेसन, शहर सचिव घनश्याम निखाडे व श्याम पुनियानी, महिला सेना शहर अध्यक्ष मनीषा पापडकर, विभाग अध्यक्ष उमेश बोरकर, शशांक गिरडे, उमेश उतखेडे, चंदू लाडे, सचिन धोटे आदींनी राज्य सरकारचा निषेध नोंदविला. राज्य सरकारने त्वरित मंदिरे उघडली नाही तर मनसेतर्फे तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा हेमंत गडकरी यांनी यावेळी दिला.