लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या धसक्यामुळे संपूर्ण देश लॉकडाऊनचा सामना करत आहे. अशा काळात वेळ कसा घालवावा, हा सर्वात मोठा प्रश्न आहे. त्यात भारतात मोबाईल युजर्सची संख्या सर्वात जास्त असून, मनोरंजनाचे सर्वात प्रमुख साधन म्हणूनही मोबाईलचा वापर भारतात मोठ्या संख्येने केला जातो. मोबाईलमुळे सर्व जग एका छोट्याशा चौकटीत तर आलेच आहे, सोबतच सोशल डिस्टन्सिंगच्या या काळात मनोरंजनाची सर्व साधने रद्द असल्याने मोबाईल हाच एक मोठा विरंगुळा ठरत आहे.चीन, इटली, स्पेन, अमेरिका, फ्रान्स, इराण, जर्मनी पाठोपाठ भारतातही कोरोना विषाणूचा प्रकोप वाढला आहे. दिवसेंदिवस संक्रमित रुग्णांची संख्या प्रचंड वाढते आहे. गेल्या दोन आठवड्यांत हजाराहून अधिक नागरिकांना कोरोनाची बाधा झाली असून, संशयितांची संख्याही प्रचंड वाढली आहे. आजवर २९ नागरिकांचा मृत्यूही याच आजाराने झाला आहे. एकट्या महाराष्ट्रात संक्रमितांची संख्या २२५च्या वर झाली आहे. नागपुरात तर संक्रमितांची संख्या १६ झाली आहे. या धसक्यामुळेच सामाजिक विलगीकरणाकरिता २४ मार्चपासून देशभरात २१ दिवसाचा लॉकडाऊन पुकारला आहे. संपूर्ण बाजारपेठा, संचारव्यवस्था बंद असल्याने आणि संचारबंदीही असल्याने घरात वेळ घालवायचा कसा, हा मोठा यक्ष प्रश्न आहे. कोणी कुटुंबासोबत वेळ घालवत आहेत तर कुणी पुस्तके वाचून ज्ञानार्जन करत आहेत. विद्यार्थी वर्ग आगामी परीक्षांच्या तयारीत आहे. तरीदेखील वेळ निघता निघत नसल्याने मोबाईल हाच आधार झाला आहे. बरेच लोक कधी नव्हे अशा व्यक्तींना, नातलगांना फोन करून कुशल-मंगल विचारत आहेत. त्यामुळे, दर महिन्यापेक्षा ज्यादा खर्च होत असल्याचेही दिसून येत आहे. देशात रिलायन्स जिओ, एअरटेल, बीएचएनएल, व्होडाफोन, आयडिया सारख्या टेलिकॉम कंपन्या कार्यरत आहेत. जवळपास प्रत्येकाजवळच कोणत्या ना कोणत्या कंपन्यांचे प्रिपेड अथवा पोस्टपेड प्लॅन आहेत. या काळात प्रत्येकाजवळच वेळ असल्याने मोबाईलवर संवादाचा काळही प्रचंड वाढला आहे. शिवाय, व्हॉट्सअप, फेसबुक, इन्स्टाग्राम, टिष्ट्वटरसारख्या सोशल माध्यमांवर आॅनलाईन राहण्याचा काळही वाढला आहे. नागरिकांच्या आॅनलाईनमुळे नेटवर्कवरील भार वाढला आणि त्यामुळे नेटवर्क स्लो झाल्याचेही दिसून येत आहे. बऱ्याच कंपन्यांनी लॉकडाऊनची ही स्थिती बघता ग्राहकांना आधीच सचेत केले असल्याने, अनेकांनी आॅनलाईनद्वारेच आपले प्लान रिन्यू करून ठेवले आहेत.फोन बंद पडणार नाहीत! कोरोनाचे संक्रमण होऊ नये म्हणून नागरिकांना घरातच कैद ठेवण्याच्या हेतूने लॉकडाऊन पुकारण्यात आला आहे. अशा काळात मोबाईल हा विरंगुळ्याचा महत्त्वाचा माध्यम म्हणून त्याबाबत टेलिकॉम रेग्युलेटरी अॅथॉरिटी आॅफ इंडिया (ट्राय)ने सर्वच टेलिकॉम कंपन्यांना प्रिपेड रिचार्जची व्हॅलिडिटी वाढविण्याच्या सूचना दिल्या आहेत. व्हॅलिडीटी संपल्यावर नागरिक ती वाढविण्यासाठी बाहेर पडतील आणि बाजार बंद असल्याने, ते शक्य होणार नाही. हा अंदाज घेऊनच ट्रायने या सूचना प्रसारित केल्या आहेत. त्यामुळे, या काळात ज्यांच्या प्रिपेडची व्हॅलिडिटी संपणार आहे, त्यांची व्हॅलिडिटी आपोआपच वाढणार असून, विरंगुळ्याचे साधन असलेला मोबाईल या काळात बंद पडणार नाही, हे जवळपास स्पष्ट झाले आहे.पोस्टपेड ग्राहकांनाही मिळेल सवलत! याच काळात पोस्टपेड ग्राहकांना बिल भरण्यासाठी त्रास होऊ शकतो. लॉकडाऊनमुळे सर्वच टेलिकॉम कंपन्यांचे सर्वच स्टोअर बंद असल्याने, ज्यांना थेट बिल भरायची सवय आहे, त्यांना ते भरता येणार नाही. अशा वेळी आॅनलाईन बिल भरण्याचा पर्याय आहे. मात्र, ज्यांना या पर्यायाची सवय नाही त्यांच्यासाठी कंपन्यांकडून वाढीव मुदत दिली जाण्याची शक्यता ट्रायच्या दिशानिर्देशावरून स्पष्ट होत आहे. भारतात ९० टक्के ग्राहक प्रिपेडचे तर दहा टक्के ग्राहक पोस्टपेडचे आहेत, हे विशेष.
लॉकडाऊनच्या काळात मोबाईलच ठरतोय विरंगुळा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2020 12:36 AM
मोबाईलमुळे सर्व जग एका छोट्याशा चौकटीत तर आलेच आहे, सोबतच सोशल डिस्टन्सिंगच्या या काळात मनोरंजनाची सर्व साधने रद्द असल्याने मोबाईल हाच एक मोठा विरंगुळा ठरत आहे.
ठळक मुद्दे बहुतांश नागरिक ऑनलाईन, खर्चही वाढला युजर्सचा ताण वाढल्याने नेटवर्क झाले स्लो