नागपूर : विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या जामठा येथील स्टेडियममध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरू असलेल्या कसोटी सामना पाहून सट्टेबाजी करीत असलेल्या चार बुकींना रंगेहाथ पकडण्यात आल्यामुळे खळबळ उडाली आहे. शहर पोलिसांनी लाईव्ह मॅच दरम्यान पहिल्यांदा सट्टेबाजी करणाऱ्या आरोपींना अटक केली आहे.
दर्शन अशोक गोहील (३२, कांदीवली, मुंबई), सुनील संतराम आमेसर (३६, सेंट्रल एव्हेन्यू), जयकिशन विष्णू कृष्णानी (२९, जुना बगडगंज) आणि प्रतीक प्रकाश मंत्री (३०, तुमसर, भंडारा) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. आमेसर आणि कृष्णानी खूप दिवसांपासून क्रिकेटची सट्टेबाजी करतात. स्टेडियम आणि टीव्हीच्या लाईव्ह सामन्यात काही काळाचे अंतर असते. या अंतरात सट्टेबाजांचे रेट बदलतात. रेटच्या अंतरात बुकींना फायदा होतो. त्यामुळे आमेसर आणि कृष्णानी जेथे सामना होतो तेथे पोहोचतात. ते स्टेडियममध्ये बसून मोबाइलच्या मदतीने सट्टेबाजी करतात. त्यांच्या या युक्तीची माहिती पूर्व नागपूरच्या नागरिकांना आहे. त्याची माहिती पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांना मिळाली. पोलिस आयुक्तांनी गुन्हे शाखेचे उपायुक्त मुमक्का सुदर्शन यांना कारवाईचे निर्देश दिले.
गुरुवारी गुन्हे शाखेचे अधिकारी-कर्मचाऱ्यांचे वेगवेगळे पथक तयार करण्यात आले. गुरुवारी यश न मिळाल्यामुळे शुक्रवारी सकाळपासून पोलिसांनी जामठा स्टेडियममध्ये सापळा रचला. त्यांना बुकी स्टेडियमच्या दक्षिण गेटजवळ बसले असल्याचे समजले. पोलिसांनी प्रेक्षकांच्या गर्दीत सामील होऊन मोबाइलचा वापर करणाऱ्यांवर बारकाईने लक्ष देणे सुरू केले. तेवढ्यात पोलिसांची नजर आमेसर आणि कृष्णानी यांच्यावर गेली. त्यांच्यापासून काही अंतरावरच गोहील आणि मंत्री हे सुद्धा बसले होते. चौघेही मोबाइलच्या मदतीने सामन्यावर ऑनलाइन सट्टेबाजी करीत होते. लगेच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून १.२५ लाखाचे सहा मोबाइल जप्त करण्यात आले. चौघांना अटक करून हिंगणा पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. तेथे त्यांच्या विरुद्ध जुगार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
आमेसर आणि कृष्णानी पूर्व नागपुरातील चर्चित बुकी आहेत. आठ महिन्यांपूर्वी त्यांनी पैशांसाठी एका आरा मशीन संचालकाच्या मुलाचे अपहरण करून मारहाण केली होती. जामठा स्टेडियममधील कारवाई पोलिस आयुक्त अमितेश कुमार, सहपोलिस आयुक्त अश्वती दोरजे, उपायुक्त मुमक्का सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक किशोर पर्वते, सहायक पोलिस निरीक्षक संकेत चौधरी, विकास दांडे, उपनिरीक्षक नासीर शेख, झाडोकर, हवालदार प्रदीप पवार, विनोद गायकवाड, सुशील श्रीवास, योगेश सातपुते, सुनील वाकडे, नितीन आकोते, मनीष रामटेके, कुणाल मसराम, राहुल गुमगावकर, दिनेश चाफलेकर, जितेंद्र दुबे, सुभाष गजभिये यांनी केली.
जामर ठरले कुचकामी
क्रिकेट सामन्यादरम्यान जामठा स्टेडियममध्ये जामर लावलेले असतात. तरी देखील आरोपी बुकी मोबाइलवर इंटरनेटचा वापर करून सट्टेबाजी करीत होते. हे पाहून पोलिसही चक्रावले. आरोपींच्या मोबाइलची तपासणी केल्यानंतर त्यांनी वापरलेल्या तंत्राची माहिती मिळू शकते.
............