लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : एकीकडे स्मार्टफोनमुळे नातेसंबंध बिघडत चालले आहे तर, दुसरीकडे ‘ब्लू व्हेल’, ‘मोमो चॅलेंज’, ‘पब्जी’ सारखे गेम्स मुलांसह मोठ्यांनाही आत्महत्या करण्यास भाग पाडत आहे. एकूणच बघता-बघता हसत्या खेळत्या घरावर दु:खांचा डोंगर कोसळत आहे. कुटुंबामधील सदस्यांचा संवाद हरवत चालला आहे. याचा प्रत्यक्ष अनुभव एका तरुणाने घेतला. लहानपणीसारखेच आपल्या कुटुंबाने आपल्याशी खेळावे, संवाद साधावा, मज्जा करावी या विचाराने झपाटलेल्या त्या तरुणाने यावर उपाय शोधला, तो बोर्ड गेमचा. कुटुंबासह मित्र-मैत्रीणींसोबत बसून खेळता येईल, मेंदूला ताण देता येईल, आपल्या कल्पनांना भरारी देता येईल, असे ‘बोर्ड गेम्स’ तयार केले. हे गेम्स काही वेळेसाठी का होईना मोबाईलपासून दूर ठेवण्याचे, कुटुंबाला जवळ आणण्याचे पर्याय ठरले.सागर पवार त्या तरुणाचे नाव. सागर शिक्षणासाठी सहा वर्षे पुण्यात होता. काही वर्ष त्याने मुंबई, बंगरूळू येथेही काढले. या वर्षांत त्याचा कुटुंबाशी असलेला संवाद कमी झाला. शिक्षण पूर्ण करून जेव्हा तो घरी परतला तेव्हा, सुरूवातीच्या दोन-तीन दिवसानंतर आपल्या कुटुंबाकडे आपल्याशी बोलण्यासाठी विषय नसल्याचे जाणवले. घरातील समस्या, वैयक्तीकबाबी सोडून कुठलाच विषय समोर येत नव्हता. प्रत्येक जण स्वत:ला मोबाईलमध्ये हरवून घेत होते. वेळ होता, परंतु तो नसल्यासारखी वागणूक होती. लहानपणी आई-बाबा, भाऊ-बहिणीसोबत खेळलेली साप-सीडी, लुडो, व्यापार हे गेम खेळताना किती मजा यायची. याची त्याला सारखी आठवण यायची. ते दिवस किती सुंदर होते, ते पुन्हा येतील का, असे त्याला नेहमी वाटायचे. आणि यातूनच त्याला ‘बोर्ड गेम’ची कल्पना सूचली. त्याचे पदवीचे शिक्षणही ‘अॅनिमेशन’मध्ये झाले होते. यामुळे क्राफ्ट पेपर, स्केच पेनच्या मदतीने गेम तयार करण्यास त्याला मदत झाली. सुरूवातीला तयार केलेले गेम त्याला स्वत:लाच आवडले नाही. अनेक प्रयत्नानंतर त्याने दोन ते आठ लोक जोडीने खेळू शकतील असा ‘इंटरॅक्टीव्ह बॅटलफील्ड’ गेम तयार केला. हा पहिला गेम सागर आपल्या कुटुंबाशी खेळला. सर्वांच्याच जुन्या आठवणी ताज्या झाल्या. आपले काहीतरी चुकत होते, हे प्रत्येकाच्या लक्षात आले. त्यानंतर कित्येकदा सागरच्या कुटुंबाने एकत्र बसून हा खेळ खेळला.सागरलाही आपले कुटुंब आपल्या जवळ आले तर इतरांचे का नाही, मोबाईलला दूर ठेवणे शक्य आहे, हे दाखवून देण्यासाठी त्याने या गेमसोबत इतरही काही गेम तयार केले. नातेवाईकांना, मित्रांना गिफ्ट म्हणून हे गेम दिले. त्यांच्यासोबत तो खेळला, इतरांनाही सहभागी करून घेतले. हळूहळू त्याच्या या प्रयत्नाला यश येत गेले. काही मोबाईलवेडे विद्यार्थी, ‘पब्जी’ गेमच्या व्यसनात सापडलेले मित्र या ‘गेम्स’मुळे त्याच्यातील मोबाईलचे व्यसन कमी झाल्याचे दिसून आल्यावर सागरने आता ही मोहीमच हाती घेतली आहे. मोबाइल गेमवर ‘बोर्ड गेम’ चांगला पर्याय ठरत आहे.‘लोकमत’शी बोलताना सागर म्हणाला, माझे कुटुंब, माझे मीत्र या बोर्ड गेममुळे एकत्र आले तर इतरांचे का नाही म्हणून मी हे गेम तयार केले आहे. यात ‘इंटरॅक्टीव्ह बॅटलफील्ड’, ‘चेक आऊट’, ‘ड्रिम्स विदीन नाईटमेअर’सह आठ गेमचा समावेश आहे. हे गेम्स आठ वर्षांवरील सर्वांसाठी आहे. या गेम्समधून एकमेकांशी संवाद साधणे, कल्पनांना भरारी देणे, विचार करायला लावणारे, मेंदूला चालणा देणारे आणि निख्खळ मनोरंजन करणारे आहेत.
मोबाईल गेमवर, बोर्ड गेम पर्याय : सागरने तयार केले हाताने गेम्स
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 04, 2020 1:02 AM
कुटुंबासह मित्र-मैत्रीणींसोबत बसून खेळता येईल, मेंदूला ताण देता येईल, आपल्या कल्पनांना भरारी देता येईल, असे ‘बोर्ड गेम्स’ तयार केले. हे गेम्स काही वेळेसाठी का होईना मोबाईलपासून दूर ठेवण्याचे, कुटुंबाला जवळ आणण्याचे पर्याय ठरले.
ठळक मुद्देकुटुंब, मित्रांना एकत्र आणण्याचा असाही प्रयत्न