नागपूर - देशाच्या संसदेत दोन दिवसांपूर्वी काही तरुणांनी घुसखोरी करत गोंधळ घातला. देशाच्या सर्वोच्च सभागृहात अशाप्रकारची घटना घडल्यामुळे देशभर चर्चा होत असून संसद आणि विधानसभा सभागृहातील सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. संसदेत प्रवेश करण्यापूर्वी प्रत्येकाची कसून तपासणी होत असते. सभागृहात जाताना काहीही नेण्यास परवानगी नसते. तरीही दोन तरुणांनी घुसकोरी करत सभागृहात रंगाच्या धुरांचे फटाके फोडले. दिल्लीतील या घटनेचे पडसाद महाराष्ट्राच्या हिवाळी अधिवेशनात पाहायला मिळाले.
दिल्लीतील घुसखोरीच्या घटनेनंतर विधानपरिषद सभागृहात पास देताना केवळ आमदारांच्या दोनच सदस्यांना पास दिले जातील, असे सांगण्यात आले. तसेच, प्रेक्षकांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे. एकीकडे संसद किंवा विधानसभेतील सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर असताना भाजपा आमदार नितेश राणे यांनी विधिमंडळातही आमदारांना मोबाईल बंदी करण्याची मागणी केली आहे. देशाच्या संसदेत खासदारांना मोबाईल घेऊन दिला जात नाही. त्याचप्रमाणे राज्याच्या विधिमंडळातही मोबाईल फोन्सना बंदी करावी, असे आमदार राणेंनी म्हटलं आहे. यावेळी, सभागृहात महत्त्वाच्या विषयावर चर्चा सुरू असतानाही आमदार भास्कर जाधव फोनवर बोलत असल्याचा व्हिडिओ त्यांनी शेअर केला आहे.
''पार्लमेंटमध्ये मोबाईल फोन चालत नाही, तिथे jammer असल्यामुळे फोन बंद असतो. विधिमंडळ सभागृहामध्ये एसटी कर्मचारी यांच्या बँकेचा महत्त्वाचा विषय चालू असताना महा फडतूस भास्कर जाधव हा फोनवर बोलताना दिसतोय. मुळात सभागृहामध्ये पार्लमेंटसारखं मोबाईल चालताच कामा नये,'' असे आमदार नितेश राणे यांनी म्हटलं. तसेच, प्रत्येक आमदाराला समोर लॅपटॉप दिला आहे, मग तो कशासाठी? सभागृहाच्या आत मोबाईलवर असं कुठलं वेगळं कामकाज असतं?, असा सवालही आमदार राणेंनी विचारला आहे.