नागपूर : उपराजधानीच्या वैज्ञानिक विकासात मोलाचा वाटा उचलणाऱ्या ‘नीरी’तर्फे (नॅशनल एन्व्हायर्नमेन्टल इंजिनिअरींग रिसर्च इन्स्टिट्यूट) शहरातील कुठल्या भागांत नेमके जास्त वायुप्रदूषण आहे याचा अभ्यास करण्यासाठी मागील वर्षी ‘मोबाईल लॅब’ची निर्मिती करण्यात आली होती. ही ‘लॅब’ संशोधनासाठी प्रचंड फायदेशीर ठरत असून या माध्यमातून शहरातील महत्त्वाच्या चौकांमध्ये गर्दीच्या वेळी वायुप्रदूषणावर नियंत्रण आणण्यासाठी प्रयत्नदेखील करण्यात येत आहेत. गेल्या काही काळापासून देशातील मोठ्या शहरांप्रमाणे नागपुरातदेखील वायुप्रदूषणाची पातळी वाढीस लागली आहे. याचा अभ्यास करण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान व उपकरणांनी युक्त अशा या ‘लॅब’ मधील छोटेखानी प्रयोगशाळेच्या माध्यमातून शहरातील निरनिराळ्या ठिकाणी हवेतील घातक वायूंची नोंद घेण्यात येत आहे.‘मोबाईल एमिशन मॉनिटरींग अॅन्ड कंट्रोल लेबॉरेटरी’ असे नाव असलेल्या या‘लॅब’मध्ये वातावरणातील निरनिराळ्या वायूंच्या घटकांची माहिती लगेच उपलब्ध व्हावी अशी यंत्रणा यात उभारण्यात आली आहे. या अभ्यासातून कुठल्या भागात वायूप्रदूषण जास्त प्रमाणात आहे व कुठे तत्काळ दखल घेण्याची आवश्यकता आहे ही बाब अधोरेखित करणे शक्य झाले आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून या ‘मोबाईल लॅब’च्या माध्यमातून शहरातील विविध चौकांमध्ये गर्दीच्या वेळेस कुठल्या घातक वायूंचे प्रमाण जास्त असते याची आकडेवारी गोळा करण्यात येत आहे. अनेकदा ‘लॅब’मधील काही उपकरणांच्या माध्यमातूनच हे कार्य करण्यात येते. लवकरच या आकडेवारीचे विश्लेषण करण्यात येणार आहे. या ‘मोबाईल लॅब’मुळे ‘नीरी’च्या संशोधकांना अचूक व वेगवान पद्धतीने वायुप्रदूषणाचा ‘डेटा’ मिळत आहे. काही ठिकाणी गर्दीच्या वेळी वायुप्रदूषण कमी करण्याचादेखील प्रयत्न या ‘मोबाईल लॅब’च्या माध्यमातून करण्यात येत आहे. शहरातील वायुप्रदूषणावर नियंत्रण आणण्यासाठी दीर्घकालीन उपाययोजनांसाठी ही माहिती फारच उपयुक्त ठरणार आहे. लवकरच या माध्यमातून शहरातील सर्वात प्रदूषित पट्टे व चौक यांची नावे समोर येतील, अशी माहिती ‘नीरी’च्या संशोधकांनी दिली. वायुप्रदूषणाचा अभ्यास करणारी ही ‘मोबाईल लॅब’ एका छोटेखानी बसमध्ये उभारण्यात आली आहे. यातील ‘इएमयू’ (एमिशन मॉनिटरींग युनिट) व ‘इसीयू’ (एमिशन कंट्रोल युनिट) हा महत्त्वाचा भाग आहे. शिवाय ‘ग्रीन हाऊस गॅसेस’, ‘सीएफसी’ (क्लोरोफ्लुरोकार्बन्स) आणि इतर ५० प्रकारच्या घातक वायूंची तपासणी करण्यासाठी ‘एफटीआयआर’ (फोरियर ट्रान्सफॉर्म इन्फ्रारेड स्पेक्ट्रोस्कॉपी’देखील या ‘लॅब’मध्ये उपलब्ध आहे. (प्रतिनिधी)
‘मोबाईल लॅब’ ठरतेय वरदान
By admin | Published: May 11, 2015 2:18 AM