नागपूर : देशाचा केंद्रबिंदू असलेल्या उपराजधानी नागपुरातील झीरो मैलावर माेबाइल नेटवर्किंगची समस्या आहे. एका खाजगी कंपनीच्या नेटवर्कशिवाय अन्य कंपन्यांचे नेटवर्क येथे चालून न चालल्यासारखे असते. यामुळे स्पीड पाेस्ट कार्यालयात येणाऱ्यांना समस्येचा सर्वाधिक सामना करावा लागत आहे.
आश्चर्याची बाब म्हणजे, स्पीड पाेस्ट कार्यालयाला लागूनच भारतीय दूरसंचार निगम लिमिटेडचे कार्यालय आहे. स्पीड पाेस्ट कार्यालयात याचे कनेक्शन आहे. तसेच नेटवर्क गतिमान करण्याचा दावा करणाऱ्या एका सर्व्हिस प्राेव्हायडर कंपनीचे नेटवर्कही मंदगतीने चालत आहे. यामुळे येथे कोणी टपाल किंवा पार्सलचे बुकिंग करण्यासाठी आल्यास संबंधित ग्राहकाला माेबाइलवरून पेमेंट करता येत नाही. एवढेच नाही तर त्यांना बुकिंगचा मेसेजही येत नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, स्पीड पाेस्ट कार्यालयाकडून या संदर्भात अनेकदा तक्रारी गेल्या आहेत. या समस्येसंदर्भात बीएसएनएलचे महाप्रबंधक यश पान्हेकर यांना विचारणा केली असता, गुरुवारी पुणे येथे तांत्रिक समस्या आल्याने काही वेळासाठी माेबाइल नेटवर्क डाउन असल्याचे सांगितले. मात्र, असे नेहमी होत नाही. स्पीड पाेस्ट कार्यालयात नेटची समस्या असल्यास याची चौकशी केली जाईल, असे ते म्हणाले.