नागपूर : मोबाईल शॉपी फोडून १.१७ लाखाचा मुद्देमाल चोरी करणाऱ्या दोन आरोपींना अटक करून गुन्हे शाखेच्या युनिट चारने १.१७ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
सैफ खान युसुफ खान आणि विधीसंघर्षग्रस्त बालक असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. कुशल पुरुषोत्तम पिंपळकर (वय ३६, रा. बापुनगर, उमरेड रोड) यांचे नंदनवन पोलिस ठाण्याच्या हद्दीत डायमंडनगर येथे के. टु. मोबाईल शॉपी आहे. बुधवारी २६ जुलैला रात्री ९.४५ वाजता ते दुकान बंद करून घरी गेले. गुरुवारी २७ जुलैला सकाळी ८.४५ वाजता ते दुकानात आले असता त्यांना अज्ञात आरोपीने दुकान फोडून १.१७ लाखाचे १० मोबाईल चोरून नेल्याचे लक्षात आले. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून नंदनवन पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला होता.
या गुन्ह्याच्या समांतर तपासात युनिट चारच्या पथकाला डायमंडनगर येथील मोबाईल शॉपीच्या चोरीतील आरोपी मोठा ताजबाग परिसरात फिरत असल्याची माहिती मिळाली. त्यांनी विधीसंघर्षग्रस्त बालकास ताब्यात घेतले असता त्याने आरोपी अलताफ खान याचे सोबत गुन्हा केल्याची कबुली दिली. त्याच्याकडून दहा मोबाईल जप्त करण्यात आले. त्यांनी तिसरा साथीदार सैफ खान युसुफ खान याचेकडून १० मोबाईल असा एकुण १.१७ लाखाचा मुद्देमाल जप्त केला. युनिट चारने विधीसंघर्षग्रस्त बालक व त्याचा साथीदार आरोपी सैफ खान युसुफ खान यास ताब्यात घेतले.
या प्रकरणी पोलिसांनी फरार आरोपी अलताफ खान (रा. मोठा ताजबाग) याचा शोध सुरु केला आहे. ही कामगिरी वरिष्ठ पोलिस निरीक्षक शाम सोनटक्के, सहायक पोलिस निरीक्षक अरविंद शिंदे, उपनिरीक्षक अविनाश जायभाये, निरंजना उमाडे, रविंद्र भोसकर, निझीर शेख, पुरुषोत्तम काळमेघ, देवेंद्र नवघरे, सतिश ठाकरे, निलेश ढोणे, पुरुषोत्तम जगनाडे, अतुल चाटे, महेश काटवले, सत्येंद्र यादव, लिलाधर भेडारकर यांनी केली.