लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गर्लफ्रेंडवर पैसे उधळण्यासाठी बनावट पिस्तुलांचा धाक दाखवून लुटमार करणाऱ्या टोळीचा प्रतापनगर पोलिसांनी छडा लावला. टोळीतील तिघांना अटक करून त्यांच्याकडून दोन बनावट पिस्तुलांसह चार लाखांचा मुद्देमाल जप्त केला. चौघांच्या या टोळीत एका अल्पवयीन आरोपीचा समावेश आहे.४ जानेवारीला प्रतापनगरातील एका व्यक्तीचा रेडमी एमआय-४ फोन काही तरुणांनी पिस्तुलाचा धाक दाखवून लुटून नेला होता. तक्रार मिळताच प्रतापनगर पोलिसांनी हिसकावून नेलेल्या मोबाईलवरून आरोपी कुणाला कॉल करीत आहेत, त्याचा सीडीआर काढला. त्याआधारे आठवा मैल (वाडी), द्रुगधामना येथे राहणारे अभिषेक अजय शेंडे (वय १९), प्रशिक पृथ्वीराज ढोके (वय १८) आणि महेंद्र रमेश मांगे (वय २१, रा. दुरखेडा बोरगाव, धापेवाडा) या तिघांना त्यांच्या एका अल्पवयीन साथीदारासह अटक केली. त्यांच्याकडून लुटमारीतील मोबाईल जप्त करण्यात आला. त्यांचा ८ जानेवारीपर्यंत पीसीआर मिळविण्यात आला.चौकशीत या टोळीने पोलिसांना धक्कादायक माहिती दिली. रात्रीच्या वेळी फिरायला निघणाऱ्या, रस्त्याने मोबाईलवर बोलत जाणाऱ्या व्यक्तींना आरोपी रोखत होते. त्यांना बनावट (खेळण्याचे) पिस्तुलाचा धाक दाखवून त्यांच्याकडून मोबाईल हिसकावून पळून जात होते. त्यांनी अशाप्रकारे सीताबर्डी, ट्रॅफिक चिल्ड्रेन पार्क, महाराजबाग मार्ग, अंबाझरी, रविनगर, संत्रा मार्केट, रामझुला परिसरातून गुन्हे करीत ३७ मोबाईल आणि दोन मोटरसायकल चोरल्याची कबुली दिली.पोलिसांनी हा चार लाख तीन हजारांचा मुद्देमाल आरोपींकडून जप्त केला. आपण ही लुटमार मौजमजा करण्यासाठी आणि मैत्रिणींवर पैसे उधळण्यासाठी करीत होतो, अशी कबुलीही आरोपींनी पोलिसांकडे दिली आहे.या टोळीचा छडा लावण्याची कामगिरी परिमंडळ-१ च्या उपायुक्त स्मार्तना पाटील, राकेश ओला, सहायक आयुक्त शेंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रतापनगरचे ठाणेदार शिवाजीराव गायकवाड, द्वितीय निरीक्षक चंद्रकांत माने यांच्या नेतृत्वात सहायक निरीक्षक सचिन शिर्के, हवालदार शंकर कोडापे, शिपाई सतीश येसनकर, आनंद यादव, सतीश ठाकरे, अतुल तलमले, आशिष क्षीरसागर, अभिषेक हरदास, धर्मेंद्र यादव, शारिक शेख आदींनी बजावली.पालकांनो सावध व्हापोलिसांनी ताब्यात घेतलेले चारही आरोपी सर्वसामान्य कुटुंबातील आहेत. कॉलेजला जातो असे सांगून ते बाहेर पडायचे व लूटमार करायचे. पालकांनी आपल्या मुलांकडे लक्ष देण्याची गरज या गुन्ह्यातून पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. त्यांची कार्यपद्धती अट्टल गुन्हेगारांनाही मागे टाकणारी आहे. लुटलेले मोबाील ते महाविद्यालयीन तरुण तसेच गोरगरिबांना कमी पैशात विकत होते. या प्रकरणामुळे पोलिसांनी कुणी कमी पैशात वस्तू विकत असेल तर ती घेण्यापूर्वी शहानिशा करावी असे आवाहन नागरिकांना केले आहे.
नागपुरातल्या प्रेमवीराने केली ‘गर्ल फ्रेण्ड’साठी लूटमार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 08, 2018 9:57 AM
गर्लफ्रेंडवर पैसे उधळण्यासाठी बनावट पिस्तुलांचा धाक दाखवून लुटमार करणाऱ्या टोळीचा प्रतापनगर पोलिसांनी छडा लावला.
ठळक मुद्देबनावट पिस्तुलाचा धाक दाखवून ३७ मोबाईल हिसकावले