नागपूर : रेल्वेगाड्या ९० टक्के सुरू झाल्या आहेत. प्रवाशांची संख्याही वाढली आहे. त्यामुळे रेल्वेस्थानकावर मोबाईल चोरटे सक्रिय झाले आहेत. आरक्षण कार्यालयात लोहमार्ग पोलीस ड्युटी करीत नसल्यामुळे मोबाईल चोरटे प्रवाशांचे मोबाईल पळवीत असल्याची स्थिती आहे.
शनिवारी रात्री वीरजी ओमदयाल प्रजापती (२२) रा. गाजी जि. अलवर, जयपूर, राजस्थान हे रेल्वेगाडीला वेळ असल्यामुळे आरक्षण कार्यालयात झोपले होते. त्यांच्या झोपेचा फायदा घेऊन अज्ञात आरोपीने त्यांच्या खिशातील १३,५०० रुपये किमतीचा मोबाईल आणि रोख ७५० रुपये काढले. झोपेतून जागे झाल्यानंतर त्यांना मोबाईल, पैसे चोरीला गेल्याचे समजले. लगेच त्यांनी लोहमार्ग पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. लोहमार्ग पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध भादंविच्या कलम ३७९ नुसार गुन्हा दाखल केला आहे. आरक्षण कार्यालय तसेच प्लॅटफॉर्मवर लोहमार्ग पोलीस ड्युटी करीत नाहीत. याचा फायदा चोरटे घेऊन प्रवाशांचे मोबाईल, पाकीट, महागडे साहित्य पळवितात. त्यामुळे लोहमार्ग पोलीस सक्रिय झाल्यास चोरट्यांचा बंदोबस्त होईल. त्यासाठी नवनियुक्त महिला पोलीस निरीक्षकांनी यात लक्ष घालून आरक्षण कार्यालय, प्लॅटफॉर्मवर पोलिसांना कर्तव्य बजावण्याची तंबी देण्याची गरज आहे.
..............