नागपूर: तामिळनाडूतील एका व्यक्तीने अगोदर १२ हजारांचा मोबाईल पाच हजारांत देऊन गुंतवणूकीच्या स्कीममध्ये लोकांना ओढले व त्यानंतर १५ लाखांनी गंडा घातला. ईमामवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली
मायकल सायमन डिसूझा (28, रा. कांचीपुरम, चेन्नई, तामिळनाडू) असे आरोपीचे नाव आहे. सप्टेंबर २०२२ मध्ये मायकल हा उंटखाना येथील एका घरी भाड्याने राहायला आला. तो चेन्नई आणि बेंगळुरू येथील इलेक्ट्रॉनिक्स कंपन्यांकडून घाऊक दराने मोबाईल आणि इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी करून कमी किमतीत विकत असे. सुरुवातीला त्याने कॉलनी आणि इतर भागातील काही लोकांना स्वस्त दरात माल विकला. दरम्यान, टॅक्सीचालक प्रशांत मेश्राम त्याच्या संपर्कात आला.
मायकलने प्रशांतला १२ हजार रुपयांचा मोबाईल पाच हजारांत दिला. पैसे दिल्यानंतर दोन-तीन दिवसांनी मायकलने प्रशांतला मोबाईल दिला. त्यामुळे प्रशांतचा त्याच्यावर विश्वास बसला. मायकलने त्याला त्याच्या व्यवसायात गुंतवणूक करून आणि इतर लोकांनाही आणून प्रचंड नफा कमावण्याच्या सापळ्यात अडकवले. त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवून प्रशांतने चार लाखांहून अधिक रुपयांची गुंतवणूक केली. प्रशांतच्या सांगण्यावरून कॉलनीतील इतर लोकांनीही मायकलला मोबाईल फोन, इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि फर्निचर स्वस्त दरात खरेदी करण्यासाठी रोख किंवा ऑनलाइन पैसे दिले. निर्धारित कालावधीनंतरही माल न मिळाल्याने लोकांनी तक्रारी करण्यास सुरुवात केली.
मायकलने सुरुवातीला डिलिव्हरीला विलंब झाल्याचे सांगितले. नंतर मालवाहतूक अडकल्याची बतावणी करण्यात आली. त्याच्या सततच्या टाळाटाळ करण्यामुळे लोकांना संशय येऊ लागला. त्यांनी दबाव आणताच मायकल पळून गेला. यानंतर लोकांना फसवणूक झाल्याचे समजले. प्रशांतने इमामवाडा पोलिस ठाण्यात तक्रार केली. तपासानंतर पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. त्याने इतर शहरातही फसवणूक केल्याचा संशय आहे. त्याचा शोध सुरू आहे.